सावदा पालिकेस मान्सूनपूर्व नालेसफाईचा विसर…!

0
9

साईमत, सावदा, ता.रावेर : वार्ताहर

शहरात गेल्या एक ते दीड महिन्यांपूर्वी नालेसफाई झाली होती. सध्या मोठ्या प्रमाणात नाल्यांमध्ये गाळ व कचऱ्यांचे ढिग साचल्याचे दिसून येते. असे असताना आता जून महिन्याची सुरुवात झाली असून याकडे अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही. हे खरे असले तरी अद्यापही नगरपालिका हद्दीतील सर्व नाल्यांची साफसफाईची कामे सावदा पालिका प्रशासनातर्फे होतांना दिसून येत नाही. त्यामुळे ही बाब चिंताजनक असून, हा विषय शहरात चर्चिले जात आहे.

पावसाच्या पाण्याचा अंदाज कोणीही लावू शकत नाही, हे मात्र खरे आहे. थेट याकडे दुर्लक्ष करून आधीच विकासाच्या नावाखाली सावदा नगरपालिका हद्दीत असलेल्या नैसर्गिक नाल्यांचे रुपांतर गटारीत झालेले आहे. त्यामुळे नाल्यांची उंची व रूंदीवर परिणाम झाल्याने पाण्याचा नैसर्गिक प्रवाह खंडित झाल्याचे नागरिकांकडून चर्चिले जात आहे. असे असताना आतापर्यंत सर्व नाल्यांची साफसफाई पालिका प्रशासनाच्यावतीने अद्यापही केलेली नाही. नाल्यांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात गाळ व कचऱ्यांचे ढिग साचल्याचे दिसून येते. अशात पावसाळ्याचे दिवस सुरु झाले आहे. कोणत्याही क्षणी कमी जास्त प्रमाणात पाऊस येण्याची शक्यता कोणीच नाकारू शकत नाही.

यंदाही गेल्यावर्षी सारखी पूर जन्य परिस्थिती उद्भवल्यास व त्याचे विपरीत परिणाम शहरवासियांसह लोंढी नाल्यांच्या पात्रात रहिवासी दारिद्रय व सामान्य कुटुंबाना आणि लहान आस्थापनाधारकांना भोगावे लागले तर यास जबाबदार कोण? पावसाच्या पूर संदर्भात अशा नाल्यांच्या पात्रात रहिवासी नागरिकांसह व्यवसायिकांना ही जागा त्वरित खाली करावी. याबाबतची फक्त जाहीर सूचना, नोटीस प्रकाशित करून मोकळे न होता सध्या पालिकेस लाभलेले नवीन मुख्याधिकारी भूषण वर्मा यांनी मागील पावसाच्या दिवसात शहरात किती बिकट अवस्था निर्माण झाली होती. त्याची माहिती घेऊन जनहिताकरिता सदर प्रकरणी स्वत: त्यांनी घटनास्थळी जावून सर्व नाल्यांची पाहणी करून जलद गतीने योग्य ती उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

स्वच्छतेच्या कामात अनियमिता

शहरात वेळेवर गटारींची साफसफाईसह कचऱ्यांची उचल होत नाही. अनेक भागात कार्य ८ ते १० दिवसात केले जाते. ठेकेदार बदलले तरी मागील वर्षासारखीच घनकचरा प्रकल्पावर ओला-सुका कचऱ्यांचे शिखर लागले आहे. सध्या त्यावर प्रक्रियाचे कार्य ठप्प दिसून येते. घंटागाड्यांची वेळ काय? हे लोकांना कळत नाही. दररोज साफसफाई केली जाते, असे चित्र निर्माण केले जात असले तरी साफसफाईसाठी कमी कर्मचारी लावल्याने शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून येते. त्या अनुषंगाने पालिका आरोग्य अधिकारी सचिन चोळके यांच्यासह मुख्याधिकारी भूषण वर्मा यांनी स्वत: पाहणी करून विशेष लक्ष देण्याची गरज आहे. याकडे स्वच्छता प्रेमींचे लक्ष लागून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here