साईमत, मलकापूर : प्रतिनिधी
दिवसेंदिवस समाजाला पारंपरिक वाद्यांचा विसर पडत चालला आहे. सार्वजनिक उत्सव, मिरवणूक, लग्न समारंभ आदी ठिकाणी डीजे वाजविण्याची प्रथा सुरू झाली आहे. त्यामुळे साहजिकच पूर्णत: बँड वादकांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यावर अवलंबून असलेला बँड मालक सोबत सर्व बँड कारागीरांच्या उपजिविकेचा फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. डीजेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. त्याचा विचार केल्यास डीजे बंद होणे गरजेचे झाले आहे. यासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी मलकापूर येथील विश्रामगृहात शनिवारी, २१ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता बँड मालक व सर्व बँड कारागीरांच्या बैठकीचे आयोजन केले आहे. बैठकीला सर्व बँड मालक, कारागीरांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचे प्रदेश सरचिटणीस निवृत्ती तांबे यांनी केले आहे.