साईमत, नंदुरबार, प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून कुठेही पाऊस पडलेला नाही. जिल्ह्यात देखील मागील महिनाभरापासून पावसाने दडी मारली आहे. यामुळे पिकांना वाचविण्यासाठी वरुण देवाला आराधना केली जात आहे. याचदरम्यान जिल्ह्यातील प्रकाशा येथे पावसासाठी देवाला साकडे घालण्यात आले. साधारण महिनाभरापासून जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली आहे. पिकांना पाण्याची आवश्यकता असताना पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे आहेत.
पाऊस नसल्याने पीक करपण्यास सुरुवात झाली असून ग्रामीण भागात पाणीटंचाईची समस्या ही समोर येऊ लागली आहे. आता पाऊस आला नाही तर आगामी काळात परिस्थिती गंभीर होणार आहे. पिकांना जीवदान मिळावे आणि ग्रामीण भागातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटावा, म्हणून प्रकाशा येथील गावकरी आणि शेतकऱ्यांनी पुरातन नीळकंठेश्वर महादेव मंदिरात पाणी भरले असून देवाला पाण्यासाठी साकडे घातले आहे. ग्रामस्थांनी पाण्यासाठी देवाला साकडे घातले असून याठिकाणी जोपर्यंत समाधानकारक पाऊस होणार नाही; तोपर्यंत मंदिरातील पाणी काढणार नाहीत, असा संकल्प त्यांनी केला आहे.