सरस्वती विद्यामंदिर शाळेतील ‘सांस्कृतिक कला उत्सव’ जल्लोषात

0
55

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

येथील पिंपळे रस्त्यावरील सरस्वती विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध कलागुणांचे बहारदार प्रदर्शनाने ‘सांस्कृतिक कला उत्सव २०२४’ नुकताच जल्लोषात साजरा करण्यात आला. श्रीराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरस्वती विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अशोक पाटील होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या सचिव योगिता पाटील, बाजार समितीचे संचालक समाधान धनगर, नितीन पाटील, भाईदास भील, शरद पाटील, गटसचिव संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील, संस्थेचे कार्याध्यक्ष समाधान शेलार, चौबारी हायस्कुलचे मुख्याध्यापक चंद्रशेखर व्यास, मुख्याध्यापक आशिष पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

शहरातील उच्चभ्रू वस्तीत गरजूंच्या मुलांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणाचा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे जयश्री पाटील यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रासह कलेच्या प्रांतातही पुढे यावे, असे आवाहन अध्यक्षीय भाषणात अशोक पाटील यांनी केले.प्रास्ताविकात मुख्याध्यापक रणजित शिंदे यांनी गरजू व सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या कलागुणांचा सर्वांगिण विकासासह मंच उपलब्ध करून देण्याचा उद्देश सांस्कृतिक कला उत्सवाच्या माध्यमातून सफल होतो, असे सांगितले.

याप्रसंगी शाळेतील माजी विद्यार्थी दिनेश सनेर याने स्पर्धा परीक्षेत मिळविलेल्या यशाबद्दल त्याचे पालक दिलीप सनेर यांचा सत्कार करण्यात आला. विद्रोही मराठी साहित्य संमेलनात साने गुरुजी विद्या मंदिर व सरस्वती विद्या मंदिराच्या विद्यार्थ्यांनी ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे’ हे गीत सादर केल्याबद्दल साहित्य संमेलन संयोजन समितीच्यावतीने देण्यात आलेल्या प्रमाणपत्राचे वितरण जयश्री पाटील यांच्या हस्ते सहभागी विद्यार्थ्यांना करण्यात आले.

खान्देशी गीतांवरील नृत्य ठरले लक्षवेधी

सांस्कृतिक कला उत्सवात बाल विद्यार्थ्यांनी सादर केलेले पालकांचे शैक्षणिक प्रश्‍नावर भाष्य करणारे ‘जागरूकता’ नाटकासह ‘अफवा’ अहिराणी नाटकास उपस्थित पालकांनी भरभरून दाद दिली. चिमुकल्या कलाकारांनी सादर केलेले ‘माझ्या पप्पांनी गणपती आणला’, ‘मामाच्या गावाला जाऊ या’, ‘इतनीसी हसी’, ‘लल्लाटी भंडारा’ या नृत्यासह गुजरातच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारे मंचावरील सादरीकरण आगळे वेगळे ठरले. ‘वाडी वाडी चंदनवाडी’, ‘गोंडा वाली पोर’, ‘पोरी करी गई तू मला बावरा’ या खान्देशी गीतांवरील नृत्य लक्षवेधी ठरले. ‘ये देश मेरे तेरी शान से बढके’, ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ आदी देशभक्तीपर नृत्य व गीत विद्यार्थ्यांनी सादर करीत वातावरण गंभीर केले होते. अहिराणी, मराठी, हिंदी गीतांसह विविध सांस्कृतिक लोकनृत्य सादर करून विद्यार्थ्यांनी उपस्थित पालकांची मने जिंकली.

पर्यावरण संरक्षणाची सामूहिक शपथ

याप्रसंगी ‘माझी वसुंधरा’ अभियानाअंतर्गत पर्यावरण संरक्षणाची व जागृतीची उपस्थित पालकांसह विद्यार्थ्यांनी सामूहिकपणे शपथ घेतली. यशस्वीतेसाठी उपशिक्षक आनंदा पाटील, ऋषिकेश महाळपुरकर, धर्मा धनगर, शितल पाटील यांच्यासह संस्थेचे शिक्षकेतर कर्मचारी गजानन पाटील, हेमंत बडगुजर, सागर भावसार, समाधान शिंदे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन उपशिक्षिका गीतांजली पाटील तर आभार संगीता पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here