साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
प्रताप महाविद्यालयात शनिवारी सकाळी रंगलेल्या पावसाळी व्हॉलीबॉल सामन्यात मुलींचा १७ वर्षे वयोगट स्पर्धेत व्हॉलीबॉल खेळात साने गुरूजी हायस्कूल, अमळनेर विरूद्ध शारदा माध्यमिक विद्यालय, कळमसरे यांच्यात चुरस झाली. मुलींची अंतिम स्पर्धा रोमहर्षक ठरली. त्यात कळमसरे हायस्कूलच्या मुलींनी मोठ्या फरकाने बाजी मारली. जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी या संघाची निवड झाली आहे.
स्पर्धेच्या विजयासाठी व्हॉलीबॉल खेळाचे मार्गदर्शक राजेश राठोड, मुनाफ तडवी या शिक्षकांनी शाळेच्या तासिकेमध्ये एकही खेळाचा तास नसतांना शाळा सुटल्यावर, शनिवारी, रविवारी सुट्टीच्या कालावधीत मुलींच्या सोबत स्वतः खेळून कसून सराव केला. त्याचे फलित म्हणून विजय प्राप्त करता आला. ग्रामीण भागात खेळाच्या सुविधा नसतांना मुलींनी शिक्षकांच्या घेतलेल्या मेहनतीला दाद दिली. सातत्यपूर्ण सराव करून आपणही यशाची शिडी गाठू शकतो हे सिध्द केले. यशाबद्दल तालुक्यात शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे.