उच्च न्यायालयाचा आदेश: संतोषी माता सभागृह नगरपालिकेच्या ताब्यात
साईमत/भुसावळ /प्रतिनिधी
भुसावळ शहरातील प्रोफेसर कॉलनी परिसरात असलेल्या संतोषी माता बहुद्देशीय सभागृहाच्या वापरासंदर्भातील वादाला अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने निर्णायक वळण दिले आहे. शासन मान्यता नसताना नगरपालिकेकडून सभागृह शैक्षणिक उद्देशासाठी वापरास दिल्याचा मुद्दा न्यायालयात गेला होता. यावर न्यायालयाने स्पष्ट आदेश दिला की, सदर सभागृहाचा विद्यमान ताबा काढून तो भुसावळ नगरपालिकेकडे सुपूर्द करावा.
या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी जळगाव जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार आज (सोमवार) सायंकाळी चार वाजता प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील यांच्यासह उपविभागीय अधिकारी, भुसावळ यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन सभागृह ताब्यात घेतले. भुसावळ नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारीही या प्रक्रियेत उपस्थित होते. प्रशासनाने ही कारवाई शांततेत आणि नियमानुसार पार पडल्याचे सांगितले.
नगरपालिकेकडून शासन मान्यता नसताना सभागृहाचा शैक्षणिक कारणांसाठी वापर केल्यामुळे मूळ उद्देश आणि जागेच्या ताबा हस्तांतरणावर प्रश्न निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना औरंगाबाद खंडपीठाने सभागृह पुन्हा नगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याचे आदेश दिले होते.
सूत्रांनी सांगितले की, ताब्यात घेतलेले सभागृह येत्या काही दिवसांत औपचारिकरीत्या नगरपालिकेकडे हस्तांतरित केले जाणार आहे. ही प्रक्रिया या आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. याशिवाय, उद्याच्या दिवशी होणाऱ्या भुसावळ नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत या विषयावर चर्चेची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे भुसावळकरांचे विशेष लक्ष लागले आहे.
