संवेदना फाउंडेशनचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी ठरणार : आ.खडसे

0
38

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचा अभाव आहे. असे असूनही आज बरेच मुले -मुली अडचणींवर मात करत विविध क्षेत्रात उच्च पदांवर सेवेत आहेत तर अनेक जण उद्योग, व्यवसाय क्षेत्रात आघाडीवर आहेत. अशातच संवेदना फाउंडेशनतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष ॲड. रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर मतदारसंघातील दहावी-बारावीतील गुणवंतांच्या सत्कारासह सेवाभावी संस्था आणि निराधार पाल्यांचा केलेला सत्कार हा सर्वांसाठी निश्‍चितच प्रेरणादायी ठरणारा आहे. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनामनात स्पर्धा निर्माण होऊन त्यांना अधिक प्रगती साधणे सहज शक्य होते. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न पाहून अधिक जिद्दीने, चिकाटीने परिश्रम करून अपेक्षित यश साध्य करावे आणि आई-वडिलांचे नाव उज्ज्वल करावे, असे प्रतिपादन विधान परिषद सदस्य आ.एकनाथराव खडसे यांनी केले. ते ॲड. रोहिणी खडसे यांच्या संवेदना फाउंडेशनतर्फे येथील गोदावरी मंगल कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्याप्रसंगी अध्यक्षीय पदावरून बोलत होते. यावेळी ईश्‍वर रहाणे, यु.डी.पाटील, निवृत्ती पाटील, विनोद तराळ, सोपान पाटील, सुधीर तराळ, रमेश खाचणे, नितीन कांडेलकर, राजु माळी, निलेश पाटील, प्रमोद धामोडे, प्रवीण कांडेलकर, भागवत पाटील, महबूब भाई, मुन्ना बोंडे आदींसह विविध शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.

आ.खडसे पुढे म्हणाले की, संवेदना फाउंडेशनतर्फे मतदार संघातील गुणवंतांच्या गौरवाची सुरू असलेली परंपरा निश्‍चितच कौतुकास्पद आहे. यावर्षी प्रथमच गुणवंतांसोबत सेवाभावी संस्थांचा आणि निराधार पाल्यांचा आई सोबत केलेला गौरव हा खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकीची जपणूक करणारा आहे. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर पडलेली शाबासकीची थाप त्यांना भविष्य वाटचालीसाठी प्रेरणादायी असते. अलीकडच्या काळात जळगाव जिल्ह्यातील अनेक जणांना स्पर्धा परीक्षेत यश मिळाले आहे. स्पर्धा परीक्षेत सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी एक दोन प्रयत्नातील अपयशाने खचून न जाता यश मिळेपर्यंत प्रयत्न सुरू ठेवण्याचा सल्ला आ.खडसेंनी दिला.

प्रास्ताविकात ॲड. रोहिणी खडसे यांनी यशस्वी मुला-मुलींच्या कौतुकासोबतच त्यांच्या पालकांचेही विशेष अभिनंदन केले. प्रत्येक पालक कष्ट घेऊन, मेहनतीने पैसा कमावून मुलांच्या भवितव्यासाठी त्याला दर्जेदार शिक्षण कसे मिळेल? यासाठी प्रयत्नशील असतो. फक्त शिक्षणच एकमेव साधन असे आहे की, त्यातूनच व्यक्तीचा विकास होऊन त्याच्या जीवनात परिवर्तन घडू शकते. म्हणूनच अशा गुणी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल कार्याला साथ देण्याचा हा संवेदना फाउंडेशनच्या माध्यमातून छोटासा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन गौरव

गौरवाची ही परंपरा यापुढेही कायम सुरु राहील. सोबत मतदार संघातील ज्या मुला-मुलींचे छत्र हरविले आहे. अशा निराधार मुला-मुलींसह मातांना तसेच सेवाभावी सामाजिक संस्थांनाही सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमात मतदारसंघातील सुमारे ३०० शालेय गुणवंत विद्यार्थ्यांना, २२ निराधार पाल्यांना आणि आठ सेवाभावी संस्थांना गौरविण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. एस.बी.साळवे, रंजना महाजन, योगिता पाटील यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here