शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांना आज सकाळी 11.30 वाजता न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यापूर्वी त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात येईल, अशी माहिती राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी दिली. 1 हजार 34 कोटींच्या पत्रा चाळ पुनर्वसन गैरव्यवहार प्रकरणी सुमारे 18 तासांच्या चौकशीनंतर ईडीने रविवारी मध्यरात्री त्यांना अटक केली होती. रविवारी सकाळी 7 वाजेपासून ते मध्यरात्री 1 वाजेपर्यंत त्यांची घरी आणि ईडी कार्यालयात चौकशी झाली.
पैसे शिवसेनेचे, शिंदेंचेही नाव
राऊत यांच्या घराची झडती घेताना ईडीच्या पथकाच्या हाती साडे 11 लाख रुपयांची रोकड लागली होती. मात्र, यापैकी 10 लाख रुपये अयोध्या दौऱ्यासाठी जमवलेले शिवसेना पक्षाचे असून त्यात एकनाथ शिंदे यांचेही नाव लिहिले आहे, असे सुनील राऊत यांनी सांगितले.
राऊतांविरोधात विनयभंगाचा गुन्हा
ईडीच्या साक्षीदार स्वप्ना पाटकर यांच्या तक्रारीवरून संजय राऊत यांच्याविरोधात रविवारी रात्री वाकोला पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. बलात्कार आणि हत्येची धमकी मिळाल्याची तक्रार पाटकर यांनी केली होती.
आई – पत्नीच्या डोळ्यात पाणी
संजय राऊत यांच्यासोबतच त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांचीही चाैकशी झाली. या वेळी राऊत यांची 84 वर्षीय आई ,भाऊ आमदार सुनील राऊत घरातच होते. सायंकाळी ईडी पथकासोबत राऊत बाहेर पडताना राऊत यांच्या आई आणि पत्नीच्या डोळ्यात अश्रू तरळले. या वेळी घराच्या खिडकीत उभ्या राहून या दोघींनी बाहेर जमलेल्या शिवसैनिकांना हात दाखवून आभार व्यक्त केले.
राऊत यांनी ‘आपण झुकणार नाही, शिवसेना सोडणार नाही,’ असे स्पष्ट केले. गळ्यात भगव्या रंगाचा गमछा घातलेल्या राऊत यांनी घराबाहेर येताच हात उंचावून शिवसैनिकांना अभिवादन केले.