पाच जण जखमी; पाळधी पोलिसात १६ जणांविरुध्द गुन्हा दाखल
साईमत /पाळधी, ता.धरणगाव /प्रतिनिधी
रेल (ता.धरणगाव) येथे वाळू उपसा करणाऱ्यांना काही शेतकऱ्यांनी, वाळू उपसा करू नका, असे सांगितले असताना वाळू माफियांनी शेतकऱ्यांवर हल्ला केला. मारहाणीत पाच जण जखमी झाल्यामुळे रेल येथे एकच खळबळ उडाली आहे.पाळधी येथून जवळच असलेल्या रेल येथे मध्यरात्रीच्या सुमारास कानळदा येथील काही जण गिरणा नदी पात्रातून रेती उपसा करीत असल्याची.
माहिती मिळाल्याने रेल येथील शेतकरी नरेंद्र पाटील, श्रीकांत पाटील, संदिप पाटील, मंगल पाटील, मनोज पाटील यांनी त्यांना सांगितले की, तुम्ही रेती उपसा करू नका, त्यामुळे आमच्या शेतातील विहिरींचे पाणी कमी होत आहे. याचा वाळू माफियांना राग येऊन त्यांनी शेतकऱ्यांना पावड्याने मारहाण करण्यास सुरूवात केली. यात संदीप पाटील यांच्या डोक्याला व पाठिला जबर दुखापत झाली तर मनोज पाटील, श्रीकांत पाटील, मंगल पाटील, नरेंद्र पाटील यांनाही मारहाण झाल्याने ते ही जखमी झाले. या सर्वांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.
याबाबत नरेंद्र पाटील यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार गणेश सोनवणे, रामकृष्ण सपकाळे, श्रावण इंगळे, गोरख सपकाळे, विशाल सपकाळे, राजेंद्र सपकाळे, शरद सपकाळे, संदिप सोनवणे, सागर सोनवणे, दिनेश सोनवणे, भाऊसाहेब सपकाळे, ज्ञानेश्वर सपकाळे, गणेश सपकाळे, कृष्णा सपकाळे, प्रविण सपकाळे, शरद सपकाळे (सर्व रा. कानळदा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हे.कॉ.महेंद्र पाटील करीत आहेत.
