तालुका क्रीडा संकुलासाठी ६.६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी

0
22

तालुका क्रीडा क्षेत्रासाठी पर्वणीच ठरणार

साईमत।अमळनेर।प्रतिनिधी।

तालुका क्रीडा संकुलासाठी आणखी ६.६६ कोटी रुपयांच्या निधीला मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली. अमळनेर तालुका क्रीडा संकुलास १०.६६ कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली होती. मात्र, त्यापैकी सुरुवातीला एक कोटी रुपये निधी आला होता. त्यातून हॉल आणि ट्रॅक, कम्पाउंड आदी कामे झाली. परंतु पुढील निधी प्राप्त न झाल्याने क्रीडा संकुल उपयोगात येत नव्हते आणि तेथील बांधकामाची तोडफोड झाली होती. लोखंडी जाळ्या चोरीस गेल्या होत्या. मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी हॉलचे नूतनीकरण, रंगरंगोटी, दुरुस्ती, ट्रॅक दुरुस्ती तसेच व्हॉलीबॉल,बास्केट बॉल मैदाने, जॉगिंग ट्रॅक यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक व तालुका क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी यांच्यामार्फत निधीचा प्रस्ताव पाठविला होता. शासनाकडून त्यासाठी दोन कोटी निधी प्राप्त झाल्याने कामांना सुरुवात झाली आहे.

कुस्ती, ज्यूडो, तायक्वांदो, कराटे, जिम्नॅस्टिकसाठी स्वतंत्र हॉलची मागणी क्रीडा संघटनेने केल्यावर पुन्हा एक कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला.त्यातून नवीन हॉलचे काम सुरू झाले आहे. प्रशासकीय मान्यतेनुसार क्रीडा संकुल अत्याधुनिक होण्यासाठी व क्रीडा साहित्य तसेच विविध सुविधांसाठी उर्वरित ६.६६ कोटी रुपयांचा निधी मिळावा, यासाठी मंत्री अनिल पाटील यांनी पाठपुरावा केला होता.

मंत्रीमंडळाने त्याला मंजुरी दिल्याने क्रीडा संकुल अधिकच अत्याधुनिक होणार आहे. तालुका क्रीडा क्षेत्रासाठी ही पर्वणीच ठरणार आहे. जिल्हा व राज्यपातळीवरील काही स्पर्धा या संकुलात होऊ शकतील. त्यामुळे तालुक्यातील खेळाडूंना भविष्यात संधी प्राप्त होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here