
ग्वाल्हेरला जैन इरिगेशनची खेळाडू चमकली, युवा मुलींच्या एकेरी गटात दुसरे राष्ट्रीय विजेतेपद
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
ग्वाल्हेर येथे नुकत्याच पार पडलेल्या ज्युनिअर राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत जळगावच्या जैन इरिगेशनच्या समृद्धी घडीगावकरने उत्कृष्ट खेळ करत युवा मुलींच्या एकेरी गटात विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात समृद्धीने महाराष्ट्राच्या केशर निर्गुण हिचा २-० सेटने पराभव करून सलग दुसरे राष्ट्रीय विजेतेपद आपल्या नावे केले. उपांत्य फेरीत तिने तमिळनाडूच्या बरकत निसा हिचा २-१ सेटने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता. दुसऱ्या उपांत्य सामन्यात केशर निर्गुण हिने पेट्रोलियम स्पोर्ट्सच्या व्ही. मित्रा हिच्यावर विजय मिळवला होता.
उपउपांत्य फेरीत समृद्धीने बिहारच्या शालू कुमारी हिचा २-० सेटने पराभव करून उपांत्य फेरीत मजल मारली होती. अंतिम सामना संपल्यानंतर पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कॅरम महासंघाच्या सचिव भारती नारायण, व्ही. डी. नारायण, प्रभजितसिंग बचेर, मदन राज, गुरिंदर सिंग, काशीराम आदी मान्यवर उपस्थित होते.
समृद्धीच्या उल्लेखनीय यशाबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, संचालक अतुल जैन, प्रशासकीय क्रीडा अधिकारी अरविंद देशपांडे, कॅरम व्यवस्थापक सैय्यद मोहसिन, क्रीडा समन्वयक रवींद्र धर्माधिकारी, सुयश बुरकुल तसेच सर्व सहकाऱ्यांनी तिचे अभिनंदन केले आहे.


