साईमत, जळगाव : प्रतिनिधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ४ जून २०२३ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ मधील राज्य सेवा गट-अ व गट-ब परीक्षेचा निकाल ६ सप्टेंबरला आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. या पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेकरिता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावांची यादी व गुणांच्या सीमारेषा (कट ऑफ) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या वेळचा कटऑफ पहाता सर्वसाधारण आणि राखीव गटात फारसा फरक उरलेला नाही.
या निकालानंतर जाहीर झालेली गुणांची सीमारेषा ही सर्वसाधारण संवर्गासाठी १०८ इतकी आहे. तर इतर मागासवर्ग, भटक्या जमाती-क, भटक्या जमाती-ड, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि निरधिसुचित जमाती या संवर्गासाठीदेखील गुणांची सीमारेषा १०८ इतकीच असल्याने चर्चेला तोंड फुटले आहे. इतर संवर्गाच्या गुणांच्या सीमारेषेमध्येदेखील अल्प तफावत दिसून आली आहे. सर्वसाधारण आणि महिला संवर्गातही फारसा फरक नाही. गुणांची सीमारेषा ही साधारणपणे १०१ ते १०८ दरम्यान आहे. केवळ दिव्यांग आणि क्रीडा कोट्यासाठी ही सीमारेषा कमी दिसून आली आहे. स्पर्धेच्या या परीक्षांमध्ये गुणवत्तेची सीमारेषाच एकमेकांमध्ये मिसळल्याची प्रतिक्रिया समाजमाध्यमांमध्ये व्यक्त होऊ लागली आहे. गुणांची स्पर्धा इतकी तीव्र असेल, तर आरक्षणाचा फायदाच काय, असा सवालदेखील विचारला जात आहे.
आठ ते दहा वर्षांपूर्वी होती तफावत
सुमारे आठ ते दहा वर्षांपूर्वी सर्वसाधारण आणि इतर मागासवर्ग, अनुसूचित जाती यांच्या गुणांच्या सीमारेषेत जाणवणारी तफावत दिसून येत होती, पण अलीकडच्या काळात गुणांची स्पर्धा वाढली आहे. आता सर्व संवर्गामध्ये बरोबरीचे पात्रतेचे गुण घेणारे उमेदवार दिसून आले आहेत, असे स्पर्धा परीक्षेच्या जाणकारांनी सांगितले.