साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
हिंदू मंदिर पुनर्बांधणीसाठी संभाजी सेनेने मंत्रालयाच्या आवारात आत्मदहन करण्याचा इशारा दिलेला आहे. मुंबई बोरिवली येथील गोराई परिसरातील पॅगोडा या संस्थेने तेथील हिंदू देवता स्वयंभू वांगणादेवीचे शेकडो वर्षांपूर्वीचे प्राचीन मंदिर उद्ध्वस्त केले आहे. ग्रामदैवत आणि ग्रामस्थांची श्रद्धास्थान असलेली माता वांगणा देवीचे मंदिर उद्ध्वस्त केल्यामुळे परिसरातील नागरिकांच्या भावना तीव्र असल्यामुळे संभाजी सेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी पॅगोडा संस्थेचे सर्व विश्वस्त यांच्यावर गोराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे. अद्यापही त्यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्यामुळे संभाजी सेनेचे संस्थापक-अध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ यांनी विश्वस्तांना तात्काळ अटक करावी. तसेच त्याच जागेवर माता वांगणा देवीचे भव्य असे मंदिर उभारून प्राणप्रतिष्ठापना करून सर्व हिंदू समाज बांधवांसाठी दर्शनासाठी पूजा अर्चनेसाठी खुले ठेवण्याचे आदेश करावेत, असे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री यांना नुकतेच देण्यात आले आहे. येत्या २१ ऑगस्ट २०२३ पर्यंत कारवाई न झाल्यास २२ ऑगस्ट रोजी मंत्रालयाच्या आवारात संभाजी सैनिकांसह आत्मदहन करणार आहे.
याप्रसंगी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास अथवा निर्माण होणाऱ्या कोणत्याही परिस्थितीत सर्वस्वी शासन आणि प्रशासनच जबाबदार राहील, असा इशारा दिल्याचे निवेदनात नमूद केले आहे. निवेदनाच्या प्रती पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त, मुंबई तसेच संबंधित सर्व पोलीस ठाण्यांमध्ये दिले आहे.