स्वातंत्र्यदिनी संभाजी भिडे राज्यात काढणार भगवा रॅली

0
3

अमरावती ः प्रतिनिधी

शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष संभाजी भिडे हे स्वातंत्र्य दिनी राज्यात भगवा रॅली काढणार आहे.या रॅलीला आता जोरदार विरोध होत आहे. काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी भिडेंना अटक करा, अशी मागणी केली आहे.
पत्रकारांशी रविवारी बोलताना यशोमती ठाकूर यांनी सांगितले की, तिरंगा हा देशाचा अभिमान आहे. तिरंग्याचा अपमान कोणीही सहन करणार नाही.स्वातंत्र्यदिनी भगवा रॅली काढणाऱ्या संभाजी भिडेंना अटक करणे गरजेचे आहे.
भिडेंवर टीकेची झोड
महात्मा गांधींचे वडील करमचंद नसून एक मुस्लीम जमीनदार आहेत, असे वादग्रस्त विधान संभाजी भिडे यांनी केले होते. त्यामुळे काँग्रेस भिडेंविरोधात आक्रमक झाला आहे. संभाजी भिडेंच्या अटकेची मागणी काँग्रेसने केली आहे. महात्मा गांधींंचे पणतू तुषार गांधी यांनी भिडेंविरोधात पुणे पोलिसांकडे तक्रार दाखल करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही टीकास्त्र सोडले आहे. तुषार गांधी यांनी आरोप केला आहे की, संभाजी भिडेंचा बोलविता धनी आरएसएस आणि नागपूर आहे.राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात एक बोलतात आणि बाहेर दुसरे
बोलतात.
भिडे म्हणाले आहेत की, १५ ऑगस्ट या दिवशी भारताची फाळणी झाली त्यामुळे १५ ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्य दिवस असूच शकत नाही. या दिवशी देशाची फाळणी झाली असल्यामुळे स्वातंत्र्य दिन साजरा करण्याऐवजी सर्वांनी उपवास कारावा आणि दुखवटा पाळावा.
दरम्यान, संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यावरून पुन्हा एकदा वातावरण तापले आहे. काँग्रेससह विरोधी पक्षांनी त्यांना त्वरित अटक करावी, अशी मागणी करून आक्रमक पवित्रा घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here