मुक्ताईनगरच्या समर्थ वंजारीला ‘बाल वैज्ञानिक’ पुरस्कार
मुक्ताईनगर ( प्रतिनिधी)-
मुक्ताईनगरच्या श्री समर्थ सायन्स क्लासेस व निळे कोचिंग अकॅडमीचा विद्यार्थी समर्थ शिवाजीराव वंजारी याने होमीभाभा फाउंडेशन (मुंबई) व भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धेत राज्यात तृतीय क्रमांक पटकावून ‘बाल वैज्ञानिक’ पुरस्कार प्राप्त केला आहे.
समर्थ वंजारी २२ एप्रिलरोजी इस्त्रोच्या श्रीहरीकोटा येथील मुख्य केंद्रावर पोहोचला. त्याला उपग्रह संशोधन, अंतराळ उड्डाण, अवकाश विज्ञानाचे प्रत्यक्ष अनुभव व मार्गदर्शन मिळणार आहे. महाराष्ट्रातून निवड झालेल्या २० गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये मुक्ताईनगरचा प्रतिनिधी म्हणून समर्थची निवड झाली आहे.
या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून १ लाख ७० हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, त्यात समर्थने सातवीतून तृतीय क्रमांक मिळवून जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे.
समर्थचे वडील शिवाजीराव वंजारी जेई स्कूलचे शिक्षक असून मार्गदर्शन समर्थला घरातूनच लाभले. त्याच्या शिक्षणात मंगेश निळेंचेचे योगदान उल्लेखनीय आहे. पद्मभूषण प्रा. पी.बी. जोशी यांच्या हस्ते मुंबईत आयोजित सोहळ्यात समर्थला हा सन्मान प्रदान करण्यात आला. कार्यक्रमास होमीभाभा संशोधन केंद्राचे अनेक शास्त्रज्ञ व अधिकारी उपस्थित होते. श्रीहरीकोटामधील भेटीदरम्यान समर्थला शास्त्रज्ञांशी थेट संवादाची संधी मिळणार आहे.
आमदार एकनाथराव खडसे, केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, आमदार चंद्रकांत पाटील, एज्युकेशन सोसायटीच्या रोहिणीताई खडसे-खेवलकर व मान्यवरांनी समर्थचे अभिनंदन केले आहे. होमीभाभा फाउंडेशन व इस्त्रो यांच्या प्रयत्नातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्याचे आणि संशोधन वृत्ती निर्माण करण्याचे कार्य होत आहे.
समर्थ वंजारीचे यश वैयक्तिक नसून, मुक्ताईनगर तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही जागतिक स्तरावर पोहचता येऊ शकते, याचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे.