साईमत, मलकापूर : प्रतिनिधी
सामाजिक संस्था ‘जनशक्ती विकास संघ’ (महाराष्ट्र राज्य) यांच्यावतीने पुणे येथे ‘समाजरत्न’ पुरस्कार सोहळ्याचे येत्या गुरुवारी, २ नोव्हेंबर रोजी आयोजन केले आहे. यावेळी रत्नांचा सन्मान सोहळा होणार आहे. त्यात कायदा तज्ज्ञ आणि विविध सामाजिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना ‘समाजरत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
कार्यक्रमात मलकापूर येथील विविध सामाजिक, धार्मिक, राजकीय कार्यात नेहमी अग्रेसर असणारे ॲड.मो.वसीम यांना २०२३ चा ‘समाजरत्न’ पुरस्कार जाहीर केला आहे. त्यांनी लॉकडाऊनच्या काळात परप्रांतीय लोकांना ई-पासची सुविधा, लॉकडाऊनमध्ये सर्व बंद असल्यावरही लोकांना मदतीचे कार्य केले आहे. त्यांचे सामाजिक कार्य पाहून ॲड.मो.वसीम यांना ‘समाजरत्न’ पुरस्काराने येत्या २ नोव्हेंबरला गौरविण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यासह अनेक पक्षाचे वरिष्ठ नेते, शैक्षणिक विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. ॲड.मो.वसीम यांना पुरस्कार जाहीर होताच विविध क्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.