रामानंद नगर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील साई संस्कार कॉलनी परिसरातून भरदिवसा एका तरुणीच्या घरातून १५ हजार रुपये किमतीचा लॅपटॉप लांबविल्याची घटना २२ मे रोजी घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, भरदिवसा झालेल्या चोरीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
शहरातील वाघ नगर परिसरातील साई संस्कार कॉलनीत वास्तव्यास असणाऱ्या निकीता विनोद पाटील (वय २५) ह्या एका खासगी इन्शुरन्सच्या कंपनीत नोकरीला आहेत. कंपनीकडून त्यांना घरुन काम करण्यासाठी लॅपटॉप दिला होता. २२ मे रोजी सकाळी निकीता पाटील नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडल्या होत्या. मॉर्निंग वॉकवरून घरी परतल्यानंतर आणि ऑफिसला जाण्याची तयारी करत असताना त्यांना लॅपटॉप ठेवलेली बॅग आढळून आली नाही. तेव्हा त्यांनी संपूर्ण घरात लॅपटॉपचा शोध घेतला. मात्र, तरीही लॅपटॉप कुठेही आढळून आला नाही. अखेर, लॅपटॉप चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठले. तेथे दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास पो.हे.कॉ. जितेंद्र राठोड करत आहेत.
