महाराष्ट्रात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा, आज राज्यभर शासकीय सुट्टी
साईमत/ जळगाव/प्रतिनिधी –:
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाल्याची माहिती समोर आली असून, या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. या अत्यंत दुःखद पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने तातडीने निर्णय घेत आज बुधवार, २८ जानेवारी २०२६ रोजी संपूर्ण राज्यात शासकीय सुट्टी जाहीर केली आहे. तसेच तीन दिवसांचा शासकीय दुखवटा पाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राज्यपालांच्या निर्देशानुसार सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय (GR) निर्गमित केला आहे. या निर्णयानुसार दुखवट्याच्या कालावधीत राज्यातील ज्या शासकीय व निमशासकीय इमारतींवर नियमितपणे राष्ट्रध्वज फडकविण्यात येतो, त्या सर्व ठिकाणी राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येणार आहे. तसेच या कालावधीत कोणतेही शासकीय करमणूक, सांस्कृतिक किंवा मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे आज राज्यातील सर्व शासकीय कार्यालये बंद राहणार असून, शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले आजचे सर्व कार्यक्रम तातडीने रद्द करण्यात आले आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी राज्यभर करण्यात येत आहे.
राज्याच्या राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय जीवनात अजित पवार यांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे मानले जाते. त्यांच्या आकस्मिक निधनाने केवळ राज्यच नव्हे तर देशाच्या राजकारणातही मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त केली जात आहे. राज्यभरातून नेते, अधिकारी, सामाजिक संघटना तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून शोकसंवेदना व्यक्त करण्यात येत असून, दिवंगत उपमुख्यमंत्र्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.
