सर्वांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन
साईमत/भुसावळ/प्रतिनिधी
विधानसभेच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवून लोकशाही बळकट करण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुसार भुसावळ शहरात पहाटेच्या सुमारास ‘रन फॉर डेमोक्रसी’ उपक्रम राबविण्यात आला. भुसावळ येथील श्रीकृष्णचंद्र हॉल येथून तापी नगर, आरपीडी रोड, कंडारीसह परिसर या भागात मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली.
हा उपक्रम निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार नीता लबडे, गटविकास अधिकारी डॉ. सचिन पानझडे, नायब तहसीलदार डॉ. अंगद असटकर, स्वीप नोडल अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप सहाय्यक अधिकारी राहुल पाटील, सहाय्यक अधिकारी प्रमोद आठवले, शिक्षणतज्ज्ञ डॉ. जगदीश पाटील यांच्यासह भुसावळ स्पोर्ट्स ॲण्ड रनर्स असोसिएशनचे डॉ. प्रवीण फालक, प्रवीण पाटील, डॉ. तुषार पाटील, डॉ. चारूलता पाटील, डॉ. नीलिमा नेहेते, डॉ. प्रवीण वारके, महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षक संघटनेचे डॉ. प्रदीप साखरे, संजीव चौधरी, आनंद पाठक, प्रदीप वराडे, दीपक भंगाळे, वंदना ठोके, विलास पाटील, प्रशांत वंजारी यांच्यासह स्वीप टिम व रनर्स यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.
मतदारांना शंभर टक्के मतदान करण्याचे आवाहन रॅलीदरम्यान करण्यात आले. तसेच रॅलीत सहभागी व्यक्तींनी आपल्या परिचयातील सर्व व्यक्तींना आग्रहाने मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन केले. प्रास्ताविक राहुल पाटील तर आभार प्रमोद आठवले यांनी मानले.