जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
गुंतवणूकीचे आमिष दाखवून ‘अठ्ठावीस महिन्यात दाम दुप्पट करून देतो’, असे सांगून नागपूर येथील एका वकीलासह त्यांच्या नातेवाईकांची तब्बल १ कोटी २२ लाख रूपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी २८ नोव्हेंबर रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
जुगलकिशोर टिकमचंद गिल्डा (वय ६५, रा. धमपेठ, नागपूर) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. वकील व्यवसाय करून ते आपला उदरनिर्वाह करतात. दरम्यान, १ जानेवारी २००६ पासून ओळखीच्या संबंधातून त्यांची व त्यांच्या नातेवाईकांना रामदेवबाबा बिल्डर ॲण्ड डेव्हलपर्स प्रा.लि. आर्वी, जि.वर्धा या संस्थेत पैसे गुंतवल्यास २८ महिन्यात रक्कम दुप्पट करून मिळेल, असे आमिष गोपाल हरीकिसन चांडक व त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखविले. त्यानुसार जुगलकिशोर गिल्डा यांनी विश्वास ठेवून वेळेनुसार त्यांना पैसे दिले.
दरम्यान, आतापर्यंत त्यांना भरलेल्या पैशांचा कोणताही मोबदला मिळाला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जुगलकिशोर गिल्डा यांनी अखेर २८ नोव्हेंबर रोजी याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात संशयित आरोपी गोपाल हरीकिसन चांडक, मोहन हरीकिसन चांडक, शारदादेवी हरीकिसन चांडक, गणेश विठ्ठल चांडक, शिल्पा गोपाल चांडक, सुजाता मोहन चांडक (सर्व राहणार आर्वी, जि. वर्धा) यांच्याविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
