साईमत : जळगाव : प्रतिनिधी
येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट व रोटरॅक्ट क्लब ऑफ जळगाव वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आणि डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी यांच्या सहकार्याने गणेशमूर्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे झालेल्या या कार्यशाळेत प्रकल्प प्रमुख अभिश्री चव्हाण यांनी प्रशिक्षण देत मार्गदर्शन केले. 85 विद्यार्थ्यांनी कल्पनाशक्तीचा आविष्कार घडवीत गणेशाची विविध रूपे साकार केली. सर्व विद्यार्थ्यांचे प्रशस्तीपत्र देऊन कौतुक करण्यात आले.
रोटरी युथ एक्सचेंज उपक्रमांतर्गत जळगावात आलेल्या मेक्सिको येथील विक्टर बाल्को व फ्रान्स येथील पियर मारी या विद्यार्थ्यांनी देखील कार्यशाळेत सहभागी होत तन्मयतेने बाप्पाच्या मूर्तीला आकार देण्याचा प्रयत्न केला.
कार्यशाळेचा शुभारंभ रोटरी वेस्टचे अध्यक्ष सरिता खाचणे, मानद सचिव मुनिरा तरवारी, आयपीपी सुनील सुखवानी, प्रेसिडेंट इलेक्ट विनीत जोशी, रोटरॅक्ट वेस्टचे अध्यक्ष प्रतीक वाणी, सेक्रेटरी ऋषिकेश रावेरकर, रोटरॅक्ट गोदावरीच्या अध्यक्ष वैष्णवी चौधरी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. रोटरॅक्ट वेस्टच्या 19 सदस्य व रोटरॅक्ट गोदावरीच्या दहा सदस्यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.