साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी
मोदी आवास घरकुलाच्या लाभार्थ्यांना पंचायत समिती कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांकडून पैसे मागणी केली जात असल्याचा आरोप करत महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष रोहिणी खडसे-खेवलकर यांनी शुक्रवारी, ९ फेब्रुवारी रोजी दुपारी गटविकास अधिकारी निशा जाधव यांची भेट घेत कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. जोपर्यंत कर्मचाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत येथून जाणार नाही. तसेच कार्यकर्त्यांसह येथेच पंचायत समितीमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा आक्रमक पवित्रा खडसे यांनी घेतला होता.
मुक्ताईनगर तालुक्यातील मोदी आवास घरकुलांच्या संदर्भात लाभार्थींनी रोहिणी खडसे यांच्याकडे तक्रार केलेली होती. त्यानुसार दुपारी ॲड.खडसे यांनी पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये गटविकास अधिकारी निशा जाधव यांच्या दालनात जाऊन लाभार्थ्यांसहित भेट घेत कर्मचारी घरकुल ऑनलाईन करण्यासाठी दहा ते पंधरा हजार रुपयाची मागणी करीत असल्याची तक्रार केली. यावरून खडसेंसह लाभार्थी व गटविकास अधिकारी यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली.
एका कर्मचाऱ्यांनी आमदाराची शिफारस आणावी, असे लाभार्थीला सांगितल्यामुळे रोहिणी खडसे अधिकच आक्रमक झाल्या. शिंदे गटातील ग्रामपंचायतमधील मोदी आवास घरकुलाचे प्रस्ताव ऑनलाईन होत असल्याचा आरोपही खडसे यांनी केला. याप्रसंगी तिघा कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाईची नोटीस गटविकास अधिकारी यांनी काढलेली आहे. त्यामध्ये बाळू कोळी, लोकेश सरोदे व अमोल जोशी यांच्याविरुद्ध कामात दिरंगाईच्या कारणावरून नोटीस बजावण्यात आली आहे.
येत्या तीन दिवसात त्यांनी खुलासा सादर करावा, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही नोटीसमध्ये म्हटलेले आहे. तालुक्यातील गोठाचे प्रस्तावही गेल्या एक ते दीड वर्षापासून प्रलंबित असल्याचे लाभार्थ्यांनी सांगितले.
याप्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती दशरथ कांडेलकर, विलास धायडे, जि.प.चे माजी सदस्य निलेश पाटील, प्रदीप साळुंखे, शहराध्यक्ष बबलू सापधरे, भैय्या पाटील, नंदु हिरोळे, सुनील काटे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. तक्रारीवरून पंचायत समितीमधील तीन कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावण्यात आलेली असल्याचे गटविकास अधिकारी निशा जाधव यांनी सांगितले.