साईमत, जळगाव : प्रतिनिधी
शहरातील सराफ बाजार येथील भवानी माता मंदिराजवळील सौरभ ज्वेलर्स नावाच्या दुकानात सोमवारी, २० मे रोजी पहाटे चार ते साडेचार वाजेच्या दरोडा टाकल्याची घटना घडली आहे. यामुळे सराफ बाजारात खळबळ उडाली आहे. तोंडाला रुमाल बांधून दुचाकीवर आलेल्या सहा जणांनी चाकूचा धाक दाखवत अंदाजे ४० तोळेेसोने असा मुद्देमाल जबरी लुटून नेल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.
जळगाव शहरातील सराफ बाजारातील भवानी माता मंदिरासमोरील महेंद्र कोठारी यांचे सौरभ ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. सोमवारी, २० मे रोजी पहाटे चार ते साडेचार वाजता तीन दुचाकीवर तोंडाला रुमाल बांधून अज्ञात सहा जण दुकानाच्या मागच्या बाजूने आले. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या सहा जणांनी मुख्य चॅनेल गेटचे मुख्य दरवाजाचे कुलूप कटरने कापले. त्यानंतर आत प्रवेश केला. त्यानंतर लाकडी दरवाजाचे छोटेसे खिडकीतून आत प्रवेश केला. त्या दुकानात दोन जण झोपलेले होते. या सहा दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवत शांत राहण्याचे सांगितले. दरोडेखोरांनी परत आतील लोखंडी दरवाजाचे कटरने कापले. आत प्रवेश करत जवळपास ४०० ग्रॅम वजनाचे सोने काढून घेतले. दरम्यान, पोलिसांच्या राऊंडच्या गाडीचा आवाज आला. त्यामुळे त्यांनी घेतलेला जेवढा आहे तेवढा मुद्देमाल घेऊन ते पसार झाले. दरम्यान, ही घटना घडल्यानंतर कामगारांनी दुकानाचे मालक कोठारी यांच्याशी संपर्क साधून दरोडा झाल्याची माहिती दिली. महेंद्र कोठारी यांनी तातडीने शनिपेठ पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलीस पथक घटनांसाठी दाखल झाले होते.
घटनास्थळी पोलीस अधिकारी दाखल
दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते. परंतु बाहेरच्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दुचाकीवर आलेले सहा जण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. जवळपास ४०० ग्रॅम वजनाचे सोने लुटून नेण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते तसेच सहायक पोलीस निरीक्षक संदीप गावित यांच्यासह पोलीस पथक घटनांसाठी दाखल झाले.