दोन-अडीच वर्षांपासून रस्ता दुरुस्ती ठप्प; काम कागदोपत्री, नागरिक मात्र त्रस्त
साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी :
तालुक्यात मंजूर झालेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामांची प्रत्यक्षात कोणतीही प्रगती न दिसता ती फक्त कागदोपत्री दाखवली जात असल्याचे धक्कादायक चित्र उघडकीस आले आहे. तालुक्यातील अनेक भागांत विकासकामांची नुसतीच घोषणा केली गेली, परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र होत नसल्याचे चित्र आता अधोरेखित झाले आहे. रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था असून, नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सन २०२३-२४ मध्ये सार्वजनिक बांधकाम उत्तर विभाग, जळगाव अंतर्गत मुक्ताईनगर तालुक्यातील विविध रस्त्यांच्या दुरुस्तीकरिता तब्बल १५० लाख रुपये (दीड कोटी) निधी विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला होता. या कामाचे भूमिपूजनही आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते. मंजूर रस्त्यात जुने कुंड, जुने घोडसगाव, तरोडा, पिंप्रीअकाराऊत, नवे घोडसगाव ते राष्ट्रीय महामार्ग ७५३ एल. ते मुक्ताईनगर नवीन कोथळी ते रा.म.प्र. जि.मा.-२३ कि.मी. १/०० ते ४/०० या मार्गाच्या सुधारीत दुरुस्तीचा समावेश होता.
यापैकी स्मशानभूमी ते जुने घोडसगाव या रस्त्याचे काम ठेकेदाराने काही प्रमाणात सुरू केले होते. अर्धा ते एक किलोमीटर रस्ता जेसीबीने उखडून कामाला सुरूवात केली गेली. मात्र, त्यानंतर तब्बल दोन ते अडीच वर्षे उलटूनही रस्त्याच्या कामाला गती मिळालेली नाही. विशेष म्हणजे, रस्ता दुरुस्तीसाठी कडेला टाकण्यात आलेली गिट्टी देखील काही दिवसांनी उचलून नेण्यात आली, अशी स्थानिकांची तक्रार आहे.
रस्त्याची कामे पूर्ण झाली असती, तर डोलारखेडा, सुकळी, नांदवेल, वायला, चिंचखेडा, महालखेडा, कुऱ्हा, वडोदा अशा २० ते २५ गावांचा ४ ते ५ किलोमीटरचा अंतर वाचला असता. आजपर्यंत लोकप्रतिनिधी किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाने या अर्धवट कामाकडे लक्ष दिले नसल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. काम कधी पूर्ण होणार? मंजूर झालेले १५० लाख रुपये प्रत्यक्षात खर्च झाले आहेत का? की काम केवळ कागदोपत्री पूर्ण दाखवण्यात आले आहे? या प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत.
नागरिकांनी संबंधित विभाग तसेच लोकप्रतिनिधींनी याप्रकरणी तत्काळ लक्ष घालावे, रस्त्याचे काम पुन्हा सुरू करून पूर्ण करावे, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे.
