मस्करीतून रिधुरीला तरुणाची हत्या, चार जण जखमी

0
14

साईमत, फैजपूर : प्रतिनिधी

यावल तालुक्यातील रिधुरी येथे कामानिमित्त जेसीबी मशीनवाला यांच्याशी मोबाईलवरून बोलत असतांना मस्करीत ‘साल्या साल्या’ असे बोलत असतांना येथे असलेल्या महिलेला वाटले की, तिच्या पतीला तो म्हणत आहे. या संशयावरून एका ४० वर्षीय तरुणाच्या डोक्यात लोखंडी पाईप मारून त्याला ठार केल्याची घटना सोमवारी, १५ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. तसेच या घटनेत चार जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी संबंधित आरोपींना पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे.

सविस्तर असे की, यावल तालुक्यातील रिधुरी येथे सोमवारी, १५ जानेवारी रोजी सायंकाळी पावणेसात वाजता धनराज वासुदेव पाटील (सोनवणे, वय ४०) हे गुरे बांधण्याच्या गोठ्यात कामानिमित्त जेसीबी मशीनवाला यांच्याशी मोबाईलवरून बोलत असतांना थट्टा, मस्करीत ते ‘साल्या साल्या’ असे बोलत होते. तेव्हा आरती सतीश सोनवणे हिला असे वाटले की, तिचे पती सतीश सोनवणे यालाच ‘साल्या साल्या’ म्हणत आहे. या संशयावरून सतीश सुकदेव सोनवणे याने त्याच्या हातातील लोखंडी पाईप धनराज वासुदेव पाटील (सोनवणे) यांच्या डोक्यात मारून ठार केले. तसेच मयताची पत्नी, मुलांना व सासरे यांना युवराज सुकदेव सोनवणे, दीपक युवराज सोनवणे यांनी लाकडी काठ्यांनी तर आरती संतोष सोनवणे, मीना युवराज सोनवणे, यमुनाबाई सुकदेव सोनवणे यांनी चापटा बुक्क्यांनी, लाथांनी मारहाण करून त्यांना दुखापत केली. त्यात वसंत झाबरु सोनवणे, सोनी धनराज सोनवणे, वैष्णवी धनराज सोनवणे, ओम धनराज सोनवणे हे जखमी झाले आहे.

याबाबत सोनी धनराज सोनवणे (रा.रिधुरी) यांनी फैजपूर पोलिसात फिर्याद दिल्यावरून सतीश सुकदेव सोनवणे, युवराज सुकदेव सोनवणे, दीपक युवराज सोनवणे, आरती सतीश सोनवणे, मीना युवराज सोनवणे, यमुनाबाई सुकदेव सोनवणे (सर्व रा.रिधुरी, ता.यावल) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आरोपी सतीश सुकदेव सोनवणे, युवराज सुकदेव सोनवणे, दीपक युवराज सोनवणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयात हजर केल्यावर येत्या शनिवारपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ करीत आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ, हवालदार राजेश बऱ्हाटे, देविदास सूरदास, विकास सोनवणे, उमेश चौधरी, रवींद्र मोरे, विजय चौधरी, अरुण नमायते दाखल झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here