महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश नन्नवरे यांची माहिती
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
संपूर्ण महाराष्ट्र राज्यात महसूल अधिकारी व कर्मचारी शुक्रवारी, १९ डिसेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारणार असल्याची माहिती महसूल कर्मचारी संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष योगेश नन्नवरे यांनी दिली. महसूल मंत्र्यांकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांवर विनाचौकशी करण्यात येणाऱ्या निलंबन कारवाया तसेच महसूल विभागाच्या दीर्घकाळ प्रलंबित आर्थिक व सेवा विषयक मागण्यांकडे शासनाकडून होत असलेले दुर्लक्ष यामुळे हा टोकाचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महासंघाच्या माहितीनुसार, जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत २८ नायब तहसीलदार व तहसीलदार, चार उपजिल्हाधिकारी, आठ मंडळ अधिकारी, १४ ग्राम महसूल अधिकारी तसेच इतर कर्मचारी निलंबित झाले आहेत. अशा सातत्यपूर्ण निलंबन कारवायांमुळे महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी दहशतीच्या वातावरणात काम करत असल्याचे सांगण्यात आले आहे.
महासंघाने स्पष्ट केले आहे की, नैसर्गिक आपत्ती व निवडणूक विषयक कामकाज वगळता, १९ डिसेंबर २०२५ पासून संपूर्ण महाराष्ट्रात महसूल अधिकारी व कर्मचारी बेमुदत कामबंद आंदोलनात सहभागी होतील. शासनाने तात्काळ हस्तक्षेप करून मागण्या मान्य केल्या नाहीत, तर आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी शासनाचीच राहील, असा ठाम इशाराही महासंघाच्या वतीने देण्यात आला आहे.
