Retired Medical Officer From Chalisgaon : चाळीसगावातील सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी फसवणुकीचे ठरले बळी

0
3

जळगाव सायबर पोलिसांची कारवाई, फसवणुकीची रक्कम रोखली

साईमत/जळगाव/प्रतिनिधी 

तुमचे बँक खाते मनी लाँड्रिंगसाठी वापरले जात असल्याची भीती दाखवून एका सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याची ऑनलाईन माध्यमातून तब्बल ३१ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, त्यातील १० लाख रुपये पोलिसांनी रोखले आहे. न्यायालयाच्या आदेशाने ती रक्कम संबंधित व्यक्तीला परत केली जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी शुक्रवारी, ४ जुलै रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

चाळीसगाव येथील फुले कॉलनीतील रहिवासी प्रकाश बाबुलाल शिंपी (वय ७३) हे सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी फसवणुकीचे बळी ठरले आहेत. एका अज्ञात व्यक्तीने स्वतःला दिल्ली पोलीस आणि सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून प्रकाश शिंपी यांना ‘डिजिटल ॲरेस्ट’ची भीती दाखवली. तुमच्या खात्याचा मनी लाँड्रिंगसाठी वापर होत असल्याचे सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने तीन वेगवेगळ्या बँक खात्यांवर ३१ लाख ५० हजार रुपये उकळले. अशा गंभीर प्रकारानंतर प्रकाश शिंपी यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी तातडीने तपास करत पोलीस निरीक्षक सतीश गोराडे, पोलीस उपनिरीक्षक मुस्तफा मिर्झा आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल दिलीप चिंचोले यांच्या पथकाने संबंधित बँकांशी पत्रव्यवहार केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे फसवणुकीच्या रकमेपैकी १० लाख रुपये रोखण्यात (होल्ड) यश आले आहे. आता ही रक्कम न्यायालयाच्या आदेशानंतर शिंपी यांना परत मिळणार आहे.

फसव्या कॉल्सला बळी पडू नका, पोलीस अधीक्षकांचे आवाहन

कस्टम, सीबीआय, ईडी किंवा अन्य कोणत्याही सरकारी यंत्रणांच्या नावाने फोन आल्यास किंवा ‘डिजिटल ॲरेस्ट’ची भीती दाखविल्यास त्याला बळी पडू नये. तसेच कोणत्याही निमित्त पैशाची मागणी केल्यास आर्थिक व्यवहार करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी सतर्क राहून अशा फसव्या कॉल्सपासून सावध रहावे, असे आवाहनही या घटनेच्या पार्श्वभूमीवर, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी नागरिकांना केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here