पाचोरा विधानसभा मतदारसंघात ‘शेतकरी शिवसंवाद’ यात्रेची फलश्रृती

0
24

कृषीकन्या सौ.वैशालीताई सूर्यवंशींनी लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांशी साधला प्रत्यक्ष संवाद

साईमत/पाचोरा/विशेष प्रतिनिधी

पाचोरा विधानसभा मतदारसंघात समस्यांचा डोंगर एका बाजूला तर दुसरीकडे सत्तेचा खेळ खेळणारे जुमलेबाज सरकार… त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतून दीर्घकालीन उपाययोजनांच्या माध्यमातून मार्ग काढायचा आहे. मतदारसंघाला सुजलाम्‌-सुफलाम्‌ करण्यासाठी कै.तात्यासाहेब आर.ओ.पाटील यांच्या स्वप्नातील भयमुक्त, भ्रष्टाचार मुक्त सर्वांगिण विकास आणि त्यासाठीच्या नियोजनासाठी मतदारसंघातील तमाम शेतकरी बांधवांना भेटून त्यांचे प्रश्न जाणून घेऊन शेती आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आराखडा तयार करावयाचे म्हणून ‘मी येत आहे, आपल्या भेटीला…’ असे आवाहन करत उबाठा शिवसेनेच्या धडाडीच्या नेत्या कृषीकन्या सौ.वैशालीताई सूर्यवंशी यांनी गेल्या ९ सप्टेंबर २०२४ रोजी काढलेल्या संवाद यात्रेला बुधवारी, ९ ऑक्टोबर रोजी एक महिना पूर्ण होत आहे. सलग तीस दिवस काढलेल्या शेतकरी शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून मतदारसंघातील १४० गावांना भेटी देत एक लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष भेटून संवाद साधला. हा त्यांचा यात्रारुपी उपक्रम सध्या मतदार संघात जबरदस्त चर्चेचा विषय ठरला आहे.

पाचोरा-भडगाव मतदारसंघ केळी, कापूस, मोसंबी आणि विविध फळभाज्यांचा उत्पादन करणारा राहिला आहे. एकेकाळी कृषी, सहकार आणि व्यापार क्षेत्रात या मतदार संघाचे नाव राज्यात आघाडीवर होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून मतदार संघाचे वैभवच ओसरल्याचे चित्र अनुभवास येत आहे तर दुसरीकडे बंद पडलेला मानसिंगका उद्योग, नगरदेवळा सूतगिरणी, कासोदा साखर कारखाना, कजगाव केळी मालधक्का या व अशा रोजगाराभिमुख संस्था उद्योग बंद पडलेले आहेत. ते पूर्ववत सुरु व्हावे यासाठी लोकप्रतिनिधींनी कोणत प्रयत्न केले? हा प्रश्न अनुत्तरीच आहे तर पाचोरा औद्योगिक वसाहत, शेतकी सहकारी संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती, पाचोऱ्यातील आजारी अवस्थेत असलेला खत कारखाना आदींची दयनिय अवस्था, नवीन उद्योग नाही, ना ही व्यापार वृद्धी ही परिस्थिती मला अस्वस्थ करते. त्यामुळे या सर्व प्रश्नांच्या मुळाशी जावून शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून उपाययोजनांचा मार्ग शोधण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यासाठी आपली तयारी असल्याचे सौ.वैशालीताई सूर्यंवशी यांचे म्हणणे आहे.

दै.‘साईमत’शी बोलतांना त्यांनी मतदारसंघाच्या विकासाचा अजेंडाच मांडला. प्रत्यक्ष कर्तृत्व भावनेतून आपण ही शेतकरी संवाद यात्रा काढली. गेली २९ दिवस ती अखंडीतपणे सुरु आहे. दररोज मतदार संघातील आठ ते दहा गावांना भेट देत प्रत्येक ग्रामस्थ, शेतकरी, माता-भगिनी, युवक, युवतींशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या केवळ अडीअडचणीच नव्हे तर त्यांच्या वेदनाही जाणून घेतल्या. या प्रयत्नातून मतदारसंघातील प्रश्न सोडविण्याचे बळ मिळाल्याचे सांगत त्यांनी १० ऑक्टोंबर २०२४ रोजी मतदारसंघात भव्य शेतकरी मेळावा घेवून या महिनाभर सुरु असलेल्या संवाद यात्रेचा सांगता समारंभ करण्यात येईल.

केवळ संवाद यात्रा नव्हे तर प्रत्यक्षात प्रश्नांच्या सोडवणुकीचा अजेंडाच आपण तयार करीत आहोत. पद, सत्तेपेक्षा लोकभावना, जनविश्वास महत्त्वाचा आहे. या यात्रेतून मला जनविश्वासाची प्रचिती आली असून त्यातून लढण्याचे बळही मिळाले.

-सौ.वैशालीताई सूर्यवंशी

शेतकरी शिवसंवाद यात्रा नव्हे तर तो एक जागर आहे. जागर शेतीचा…. जागर भय अन्‌ भ्रष्टाचार मुक्तीचा… जागर विकासाचा… सत्याचा… परिवर्तनाचा…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here