व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बालगोपालांचा संमेलनात सहभाग
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
येथील समाज चिंतामणी प्रतिष्ठानतर्फे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पहिले अखिल भारतीय आंतरभारती बालकुमार साहित्य संमेलन गेल्या १३, १४, १५ ऑगस्ट असे तीन दिवस नियोजनबद्ध पद्धतीने पार पडले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस होते. उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक तथा शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुरेश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. साहित्य संमेलनात पुणे, मुंबई, नागपूर, नांदेड, सांगली, सातारा, अमरावती, वाशिम, वर्धा, परभणी, अहिल्यानगर, लातूर, कोल्हापूर आदी जिल्ह्यातील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ साहित्यिकही सहभागी झाले होते. गेल्या दहा वर्षांपासून समाज चिंतामणी प्रतिष्ठान वाचन संस्कृती वृद्धिंगतसाठी नवोपक्रम राबवित आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष आर. डी. कोळी तर सूत्रसंचालन जळगाव येथील आकाशवाणी केंद्राच्या निवेदिका वैदेही नाखरे यांनी केले.
बालसाहित्य बालकुमार वाचकांना जीवनरस पुरवित असते. बालसाहित्य ही चांगला माणूस घडविण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाची पहिली पायरी आहे. ही पायरी मजबूत असली पाहिजे. ज्ञान आणि मनोरंजन यांचा ताल आणि तोल सांभाळत बालसाहित्य निर्मिती करण्याचे आवाहन उद्घाटक नांदेडचे ज्येष्ठ साहित्यिक तथा शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुरेश सावंत यांनी केले. समाज आणि सरकारने बालसाहित्याकडे विशेष लक्ष द्यावे. तरच प्रत्येक भाषेतील बालवाङ्मयाचे समृद्ध संस्कार पचवून उद्याचा भारत सक्षम व समर्थ होईल. बालसाहित्यिक आहेत, पण त्यांच्या साहित्याची समीक्षा होत नाही. समीक्षकांनी बालमनास लक्षात घ्यावे. विश्व संस्कृती, विश्व कल्याण व विश्व शांतीचे संस्कार बालसाहित्यातून व्हायला हवे आहेत, असे प्रतिपादन पुणे येथील ज्येष्ठ साहित्यिक तथा विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
अवांतर वाचनाची आवड निर्माण होऊन बालकांची पावले वाचनालयाकडे वळणे खूप आवश्यक आहे. वाचन संस्कृतीचा वारसा पुढे नेण्याच्या दृष्टीने अशी बालकुमार साहित्य संमेलने ही आज काळाची गरज आहे. अशा पार्श्वभूमीवर आपल्या संस्थेने आयोजित केलेले ऑनलाईन साहित्य संमेलन अतिशय महत्त्वाचे ठरले असल्याचे संमेलनाच्या स्वागताध्यक्षा तथा नागपूरच्या लेखिका प्रा. विजयाताई मारोतकर यांनी सांगितले. समारोपाच्या अध्यक्षा माया धुप्पड म्हणाल्या, की शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या प्रतिभा, भाषा, संवेदनशीलता, संस्कारांकडे मनस्वीपणे पाहत संमेलनात अभिवाचन, बालकुमार कविसंमेलन, कथाकथन आदी सत्रे दिमाखात पार पडली. वाचनसंस्कार आणि साहित्य चळवळ ही दोन महत्त्वाची उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून डिजिटल युगात, डिजिटल साधनांचा चांगला उपयोग होऊ शकतो, हे संमेलनातून सिद्ध झाले.
तळमळ अन् जाणिवेतून संमेलन यशस्वी
संमेलनाचे प्रमुख आयोजक आर.डी. कोळी यांची तळमळ आणि जाणीवेतून संमेलन उभे झाले आणि ते यशस्वी झाले. संमेलनाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बालगोपाल उपस्थित राहिले. त्यांनी सहभाग घेतला आणि त्यांना मान्यवरांच्या कथा, कविता, गायनाबाबत मार्गदर्शन लाभले. बालकुमारांमध्ये साहित्याची आवड निर्माण होईल, अशा प्रकारे सत्रांचे आयोजन केले होते.