साईमत, चोपडा : प्रतिनिधी
महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता पंधरवड्याचे यशस्वी आयोजन केले होते. स्वच्छता पंधरवड्याच्या अनुषंगाने शाळेत विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यात १ ली, २ रीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होतेे. याप्रसंगी स्वच्छतेचा संदेश देणारे विविध आकर्षक चित्रे विद्यार्थ्यांनी रेखाटली. त्यासाठी त्यांना शाळेतील कलाशिक्षक देवेंद्र बारी व सोनाली देवरे यांचे मार्गदर्शन लाभले. ३ री व ४ थीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित केली होती. शाळेतील शिक्षिका सुचिता पाटील व किर्ती चौधरी यांनी ‘स्वच्छता अभियान’ विषयावर निबंध स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले. ५ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षिका वैशाली गायकवाड आणि सुषमा पाटील यांनी मार्गदर्शन केले. ९वी व १० वीच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा संदेश देणारे पथनाट्य सादर करुन मुलांमध्ये आणि समाजात जनजागृती केली. पथनाट्याच्या माध्यमातून प्लास्टिकच्या गैरवापराचे होणारे हानिकारक परिणाम विद्यार्थ्यांनी पटवून दिले. पथनाट्यासाठी विद्यार्थ्यांना उपप्राचार्य अमन पटेल आणि शिक्षिका दीपाली पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील शिक्षिका माधुरी पाटील व अश्विनी ढबू यांनी विद्यार्थ्यांना महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनचरित्राविषयी मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका ममता न्याती यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.