साईमत, मलकापूर : प्रतिनिधी
गुरुगोविंदसिंग यांच्या जयंतीनिमित्त संगतवाडी गुरुद्वारा प्रबंधनच्या माध्यमातून ११ जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यात गुरूआरती, महाप्रसाद, लंगर भोजन कारसेवा यासोबतच शालेय विद्यार्थ्यांमध्ये गुरुगोविंदसिंग यांचा धर्माभिमान, त्याग, सेवाभाव आणि पराक्रमी इतिहासाची अधिक माहिती मिळविण्याची जिद्द निर्माण व्हावी, याकरीता निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. शहरातील विविध माध्यमांच्या १३ शाळांमधून स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेत २५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. संगतवाडी गुरुद्वारा येथे झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी गुरुगोविंद सिंग यांच्या इतिहासावर प्रकाश टाकणारी उत्स्फूर्त भाषणे व अभ्यासपूर्ण निबंध लेखन सादर केले.
दुपारच्या सत्रात झालेल्या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभासाठी अध्यक्षस्थानी कारसेवक बाबा रवींद्रसिंह होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने होते. यावेळी अशोक राजदेव, रमेशसिंह राजपूत, भाईअशांत वानखेडे, दामोदर लखानी, पालिगुरु गुरुसेवक हाजुरी रागी, श्री दरबारसाहब अमृतसर पंजाब, ग्यानी इकबालसिंग पंजोर हरियाणा, ग्यानी जसवंतसिंग गुरूद्वारा चांदनी चौक दिल्ली, अंग्रेजसिंग चांदनी चौक सिजंगा गुरुद्वारा, सुखवंत सिंग, ज्ञानदेव पाटील आदी उपस्थित होते.
स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी शिखांचा शौर्य इतिहास व गुरुगोविंदसिंगांचा त्याग आणि सेवाभावी जिवन चरित्र उलगडून दाखविले. त्यांनी आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीत गुरु आणि त्यातील अनेक दोहे पंजाबी भाषेत बोलून संत तुकाराम महाराज आणि गुरुगोविंदसिगांच्या विचार व कार्यातील सेवाभाव यावर प्रकाश टाकत उपस्थितांना संबोधित केले.
यावेळी बक्षीस वितरण समारंभात मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. त्यात महाविद्यालयीन गटातून प्रथम धनाजी नाना चौधरी समाजकार्य महाविद्यालयाची माधुरी गजानन राऊत, द्वितीय लि.भो.चांडकची सृष्टी फरप, तृतीय गोविंद विष्णू महाजन विद्यालयाची वैष्णवी गजानन काळे तर गायत्री गजानन दोडे हिला प्रोत्साहनपर तसेच माध्यमिक गटातून हिराबाई संचेती कन्या शाळेतील भाग्यश्री गोपाल पाटील प्रथम, यशोधाम स्कुलची कार्तिकी झनके द्वितीय, गोविंद विष्णू महाजन विद्यालयाचा मोहित पवार तृतीय तर ओम झंवर यांस प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात आले. तसेच वक्तृत्व स्पर्धेत महाविद्यालयीन गटातून प्रथम के.के.अग्रवाल महाविद्यालयाचा रोशन खोडके, जनता महाविद्यालयाची वैष्णवी राठोड, के.के.अग्रवाल महाविद्यालयाची शबाना शेख तृतीय तर धनाजीनाना चौधरी समाजकार्य महाविद्यालयाची ऋतुजा इंगळे हिला प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात आले. माध्यमिक गटातून स्कुल ऑफ स्कॉलर्सची ज्ञानिका जयस्वाल प्रथम, नूतन विद्यालयाची श्रृती गावंडे द्वितीय, स्कुल ऑफ स्कॉलर्सची हुमा कौसर तृतीय तर हिरबाई संचेती कन्या शाळेची अस्मिता गारमोडे हिला प्रोत्साहनपर पारितोषिक प्राप्त झाले.
यशस्वीतेसाठी दामोदर शर्मा, डॉ.विजय डागा, मोहन शर्मा, प्रा.डॉ.नितीन भुजबळ, निलेश हिवाळे, केशव किन्होळकर यांच्यासह संगतवाडी गुरुद्वारा प्रबंधन मलकापूरचे अन्य सेवकांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक अशांत वानखेडे यांनी केले.