अवयव दान , देहदान करण्याचा संकल्प करा – कुलगुरू प्रा. व्ही. एल.माहेश्वरी

0
29

साईमत जळगाव प्रतिनिधी

एका व्यक्तीने ठरवल्यास तो आठ जणांना जीवदान देऊ शकतो त्यासाठी नेत्रदान,त्वचा दान,अवयव दान आणि देहदान करण्याचा संकल्प करावा असे आवाहन कवयित्रीबाई बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एल.माहेश्वरी यांनी केले.
नेत्रदान, त्वचादान, देहदान याबाबत फेडरेशन ऑफ ऑर्गन अॅण्ड बॉडी डोनेशन मुंबई, या सामाजिक संस्थेतर्फे जनप्रबोधन करणारी रथयात्रा मंगळवार दि. १३ फेब्रुवारी रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आली. या निमित्त आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगाव यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

नाशिक ते आनंदवन अशी १४३० कि.मी. ची ही रथयात्रा आयोजित करण्यात आली आहे. प्रा माहेश्वरी आपल्या भाषणात म्हणाले की, आज कोणतेही विज्ञान कृत्रिम रक्त बनवू शकत नाही. रक्त हे फक्त मानवच दान करू शकतो त्यामुळे प्रत्येकाने रक्तदान करण्यासाठी पुढाकार घ्यावा.
या कार्यक्रमात अध्यक्ष पुरुषोत्तम पवार यांनी संस्थेच्या कामाची माहिती दिली. इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगावचे अध्यक्ष डॉ. विनोद बियाणी, उपाध्यक्ष डॉ. गणी मेमन आणि डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यावेळी उपस्थित होते.

इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगावच्या वतीने देहदान करण्यासाठी भरावयाच्या अर्जाचे अनावरण करण्यात आले. विभागाचे संचालक प्रा. आशुतोष पाटील यांनी प्रास्ताविक केले. या समारंभात देहदान, अवयवदान, नेत्रदान केलेल्या व्यक्तीच्या परिवाराचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुभाष पवार यांनी केले. उज्ज्वला वर्मा यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here