दोन लाख ८० हजाराचा निधी प्राप्त, दोन संशोधन उपकरणे घेण्यास मान्यता
साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी
चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे बी. पी. आर्टस, एस.एम. ए. सायन्स आणि के. के. सी. कॉमर्स महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातील प्रा. डॉ. जामतसिंग दरबारसिंग राजपूत यांना महाराष्ट्र सरकारच्या राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाकडून २०२४-२०२६ या काळाकरिता संशोधन प्रकल्प मंजूर केला आहे. त्यासाठी दोन लाख ८० हजार एवढा निधी प्राप्त झालेला आहे. आहे. या निधीत दोन संशोधन उपकरणे घेण्यास मान्यता आहे. त्यांच्या संशोधनाचा विषय ‘गोमूत्रावर आधारित कीटकनाशकांच्या फॉर्म्युलेशनचा अभ्यास आणि त्यांच्या सहक्रियात्मक प्रभावाचा अभ्यास’ असा असणार आहे.
डॉ.राजपूत यांनी निधीसाठी तीन वेळा प्रयत्न केले होते. त्याआधी डॉ.राजपूत यांचा दोन लाख निधीचा ऊर्जा ॲग्रोबाओटेक कंपनीसोबत उद्योग प्रायोजक प्रकल्प पूर्ण आहे. त्यासोबतच अांतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित नियतकालिकांमध्ये त्यांचे चाळीसपेक्षा जास्त शोध निबंध प्रकाशित आहेत. डॉ.राजपूत यांना त्यांच्या संशोधनातील सातत्यपूर्ण कामगिरीसाठी २०२०-२०२१ या वर्षात राष्ट्रीयस्तरावरील यंग अॅचिव्हर अवॉर्ड प्राप्त झाला आहे. त्याचसोबत अमेरिकेतील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या अल्पर-डोगर वैज्ञानिक यादीत (AD Scientific Index) डॉ.राजपूत यांना २०२१ ते २०२३ या सलग तिसऱ्यावर्षी स्थान मिळालेले आहे.
यांनी केले अभिनंदन
त्यांच्या गुणवत्तापूर्ण कामगिरीबद्दल संस्थेचे मॅनेजिंग बोर्ड चेअरमन नारायण अग्रवाल, व्हाईस चेअरमन योगेश अग्रवाल, अध्यक्ष आर.सी.पाटील, सचिव डॉ.विनोद कोतकर, सिनिअर कॉलेज कमिटीचे चेअरमन सुरेश स्वार, प्राचार्य, उपप्राचार्य आणि सर्व प्रशासकीय अधिकारी, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.