साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी
जळगाव शहरातील सर्वच बगीचे सकाळ सत्र व संध्याकाळ सत्र अशा मर्यादित वेळे पुरतेच खुली असल्याने दिवसभरात शहरातील व शहराबाहेरील येणाऱ्या लोकांच्या दृष्टीकोनातून विचार करता पूर्णपणे गैरसोयीचे आहे. शहरात मोठ्या स्वरुपात आरोग्य सुविधा उपलब्ध असल्याने उपचारासाठी येणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची संख्या खूप मोठी आहे. त्याच प्रमाणे शहरातील बाजारपेठांसाठी बाहेर गावाहून येणारी ग्राहक, कोर्ट/शासकीय कामानिमित्त येणारी लोक, विद्यार्थी यांच्यासाठी विसावा, जेवणासाठी कुठलीही अधिकृत पर्यायी व्यवस्था नसल्याने त्यांची गैरसोय होते, त्यासाठी शहरातील बगीचे सुरक्षारक्षक नेमून दिवसभर खुली ठेवणे गरजेचे आहे.
रमाई फाउंडेशन, जळगाव या सामाजिक संस्थेच्या वतीने या मागणीच्या आशयाचे निवेदन जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर सौ.जयश्री महाजन यांना देण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सचिन अहिरे, सचिव आनंद महाजन, इमाम पिंजारी आदी उपस्थित होते.