महाविकास आघाडीची पत्रकार परिषदेद्वारे मागणी
साईमत/जामनेर/प्रतिनिधी :
शहरातील मतदार याद्यांमध्ये बोगस नावे, दुबार नावे मोठ्या प्रमाणात आहेत. ती नावे कमी करण्यात यावी, अशी मागणी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेद्वारे केली आहे. शहरातील वाकी रोड स्थित माजी नगराध्यक्ष सुभाष (राजू) बोहरा यांच्या कार्यालयात महाविकास आघाडीच्यावतीने बुधवारी, २८ ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली.
यावेळी महाविकास आघाडीचे किशोर पाटील, डॉ. प्रशांत पाटील, अनिल बोहरा, राजू खरे, जावेद मुल्लाजी, डॉ.मनोहर पाटील, प्रदीप गायके, जीवन सपकाळ आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
शहरातील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस नावे, दुबार नावे व मयत अशी नावे समाविष्ट आहे. ती नावे कमी करण्यात यावी, यासाठी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी २० रोजी तहसील कार्यालयात जाऊन रितसर हरकती नोंदविल्या होत्या. त्या हरकतींवर १५ दिवसात तहसिलदारांकडून खुलासा करण्यात येणार होता. मात्र, त्या आधीच म्हणजे ३० तारखेला प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार असल्याने हरकती घेऊन फायदा नसल्याचे व दुबार नावांबाबत कुठलाही तपास, खुलासा वा कोणालाही नोटीस देण्यात आलेली नाही. त्याची माहिती त्यांच्याकडून पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली.