जिल्हा शासकीय अभियंता सहकारी पतपेढीतर्फे ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
जळगाव जिल्हा शासकीय अभियंता सहकारी पतपेढीने ‘वाचन प्रेरणा दिन’ नुकताच उत्साहात साजरा केला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लातूर बोर्डचे सेवानिवृत्त विभागीय सचिव शशीकांत हिंगोणेकर, भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशीचे संस्थापक विजय लुल्हे उपस्थित होते. तसेच अभियंता पतपेढीचे आजीव अध्यक्ष इंजि. साहेबराव पाटील, व्हा. चेअरमन इंजि. चंद्रशेखर तायडे, संचालक इंजि. ब्रह्मानंद तायडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांनी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून केली. याप्रसंगी मान्यवरांचे शाल व पुस्तक भेट देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी शशीकांत हिंगोणेकर यांनी वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व विषद केले. तसेच डॉ. अब्दुल कलाम यांच्या उल्लेखनीय कार्याची माहिती दिली. वाचन संस्कृती वाढविण्यासाठी शासनाच्या प्रयत्नांमध्ये सर्वांना सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. शाळा, महाविद्यालयातील वाचनालयाचा विद्यार्थ्यांना लाभ झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘वाचन प्रेरणा दिन’ हा फक्त एक इव्हेंट नसून वाचन संस्कृती वाढवण्यासाठी ठोस पाऊले उचलण्याचा मार्ग आहे. पुस्तक भिशीच्या माध्यमातून चालविलेल्या उपक्रमाची विजय लुल्हे यांनी माहिती देऊन अभियंता पतपेढीस पुस्तकांचा एक सेट भेट दिला.
यावेळी शशीकांत हिंगोणेकर यांनी ‘पोस्टमन’ कविता सादर करून उपस्थितांना भाववर्धन केले. तसेच कवयित्री किर्ती पाटील यांनीही कविता सादर केली. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. यशस्वीतेसाठी राजेंद्र पाटील, विश्वेश पाटील यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक अभियंता पतपेढीचे आजीव अध्यक्ष इंजि. साहेबराव पाटील तर संचालक ब्रह्मानंद तायडे यांनी आभार मानले.