मनपा पातळीवरील स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळवत शाळेचे नाव उज्ज्वल
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील प्रेम नगरातील बी. यू. एन. रायसोनी इंग्लिश मीडियम स्कुलमध्ये विद्यार्थ्यांचा केवळ स्पर्धा परीक्षा व शैक्षणिक प्रगतीकडेच भर दिला जात नाही तर त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा क्षेत्रालाही तितकेच महत्त्व दिले जाते. शाळेत विद्यार्थ्यांना विविध खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी सतत प्रोत्साहन दिले जाते. खो-खो, कबड्डी, बुद्धिबळ, फुटबॉल आदी खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. मनपा पातळीवर झालेल्या स्पर्धांमध्ये काही विद्यार्थ्यांनी उत्तम प्राविण्य मिळवत शाळेचे नाव उज्ज्वल केले.
त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करण्यासाठी शाळेत शाळेचे अध्यक्ष शिरीष रायसोनी, उपाध्यक्ष उमेद रायसोनी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व प्रमाणपत्र वितरण सोहळा आयोजित केला होता. याप्रसंगी विजेत्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास म्हणजे केवळ अभ्यास नव्हे तर क्रीडा, संस्कार आणि स्पर्धात्मक दृष्टिकोन यांचा संगम होय, असे शाळेचे प्राचार्य मनोज शिरोळे यांनी सांगितले.