डोंगरकठोरातील आपदग्रस्तांना शासन अन्‌ रेडक्रॉस सोसायटीतर्फे जीवनावश्‍यक वस्तूंची मदत

0
56

साईमत, यावल : प्रतिनिधी

तालुक्यातील डोंगरकठोरा येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत अनिल धनराज सरोदे आणि दगडू गेंदू पाटील यांच्या घरातील गृहोपयोगी वस्तूंची तथा संसाराची राखरांगोळी झाली होती. घटनेची यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी तात्काळ दखल घेऊन दोन्ही कुटुंबियांना महाराष्ट्र शासन आणि जळगाव जिल्हा इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्यावतीने आपदग्रस्तांना प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन योजनेअंतर्गत मदतीचा हात पुढे केला आहे.

तालुक्यातील डोंगरकठोरा येथे गेल्या १० फेब्रुवारी रोजी येथील अनिल धनराज सरोदे आणि दगडू गेंदू पाटील यांच्या घरात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत गृहोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या होत्या. तसेच त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला होता. त्यात जीवनावश्‍यक वस्तू व रोख रक्कम असे सहा लाखांच्यावर दोघांचे नुकसान झाले होते. घटनेची तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी तात्काळ गांभीर्याने दखल घेत नुकसानग्रस्त कुटुंबियांना मदत मिळवून देण्यात खारीचा वाटा उचलला.

तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी शासन स्तरावरील पाठपुराव्यामुळे इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखेच्यावतीने मंगळवारी, १३ फेब्रुवारी रोजी अनिल सरोदे आणि दगडू पाटील या कुटुंबियांची भेट घेऊन जीवनावश्‍यक वस्तूंची मदत केली. तसेच अनिल सरोदे यांचे आगीत महत्त्वाचे संपूर्ण कागदपत्रे जळाल्यामुळे तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी त्यांना रेशनकार्ड दिले. प्रसंगी माझ्या परीने शक्य होईल तितकी मदत देण्यात येईल. जास्तीत जास्त मदत मिळण्याकरिता शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल, असे आश्‍वासन त्यांनी उपस्थितांना दिले. आपण १२ फेब्रुवारी रोजीच जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे मदतीसाठी पाठपुरावा केला असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच आपदग्रस्त कुटूंबियांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याबाबत ग्रामस्थांनी आर्थिक मदत जमा करण्याबाबत चर्चा केली. ग्रामपंचायतीनेही मदत देण्याचे जाहीर केल्यावर तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनीही तहसील कार्यालयाच्यावतीने आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्‍वासन दिले.

यावेळी इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखेच्यावतीने मदतीचा हात म्हणून अनिल सरोदे आणि दगडू पाटील या कुटुंबियांना देण्यात आलेल्या गृहोपयोगी किटबाबत ग्रामस्थांच्यावतीने कौतुक करण्यात आले. तसेच इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखेच्यावतीने आपदग्रस्त कुटुंबियांना मदत करून योगदानात खारीचा वाटा उचलला असल्याची भावना इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या पीआरओ उज्ज्वला वर्मा यांनी व्यक्त केली.

यावेळी इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष गनी मेमन, चेअरमन विनोद बियाणी, रक्त केंद्राचे चेअरमन प्रसन्नकुमार रेदासनी, आपत्ती व्यवस्थापनचे चेअरमन सुभाष साकला, ऑफिस असिस्टंन्ट मनोज वाणी, सरपंच नवाज तडवी, उपसरपंच धनराज पाटील, पोलीस पाटील राजरत्न आढाळे, तलाठी वसीम तडवी, ग्रामपंचायत सदस्य दिलीप तायडे, कोतवाल विजय आढाळे, ग्रामस्थ भोजराज पाटील, गंगाधर जावळे, योगेश ठोंबरे, दत्तू गुरव, रवींद्र पाटील, संजय आढाळे, दुलचंद पाटील, गणेश जावळे, ललित पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here