साईमत, भुसावळ : प्रतिनिधी
आत्मशोधातून कवितेची रचना करत असताना कवी आपल्या संवेदनशील मनातून सभोवतालचे जगही टिपत असतो. जयश्री काळवीट यांची कविता आत्मशोध आणि सभोवतालचे अभिव्यक्ती मांडणारी आहे. त्यांच्या कवितेचे मुख्य सूत्र आशयगर्भ कविता आहे. ‘कवितेच्या गहिऱ्या डोही’ ह्या काव्यसंग्रहातून त्यांच्या संवेदनशील मनाचे प्रतिबिंब उमटले असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर यांनी केले.
भुसावळ येथील ब्राह्मण संघात आयोजित कवयित्री जयश्री काळवीट रचित ‘कवितेच्या गहिऱ्या डोही’ ह्या काव्यसंग्रह प्रकाशन सोहळ्याच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी मू.जे.महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त मराठी विभाग प्रमुख डॉ. चारूता गोखले होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त उपप्राचार्य तथा ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ. वा. ना. आंधळे, मू.जे. कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा.सौ. संध्या महाजन, बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश पाटील यांच्यासह कवयित्री सौ. जयश्री काळवीट व मध्य रेल्वेतील लोको पायलट प्रसाद काळवीट उपस्थित होते. प्रारंभी सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. मान्यवरांचा शाल, श्रीफळसह स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविकात ‘कवितेच्या गहिऱ्या डोही’ ह्या काव्यसंग्रह लेखनामागची भूमिका कवयित्री जयश्री काळवीट यांनी मांडली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. प्रा.डॉ. वा. ना. आंधळे यांनी मनोगतातून कवयित्री जयश्री काळवीट यांच्या काव्यसंग्रहाचा सर्वांगसुंदर आढावा घेतला. तसेच त्यांच्या कविता आत्मशोधातून आत्मबोधाकडे जाणाऱ्या असल्याचेही त्यांनी सांगितले.
कवयित्री जयश्री काळवीट यांच्या कविता म्हणजे त्यांच्या भावविश्वाचे अनुभव कथन असल्याचेही डॉ. जगदीश पाटील यांनी सांगितले. महिलांच्या आयुष्यात येणारे विविध प्रसंग व त्यावर करायची मात आणि त्यातून प्रतिभाशक्ती जोपासून केलेली काव्यनिर्मिती हेच कवीमनाचे उत्तम लक्षण असल्याचे प्रा.सौ. संध्या महाजन यांनी सांगितले.
अध्यक्षीय मनोगतात डॉ. चारूता गोखले यांनी कवयित्री जयश्री काळवीट यांच्या काव्यामधील विविध कंगोरे आणि सौंदर्य याविषयी सांगून त्यांच्या कविता अनुभवांच्या काठावर घासून निर्माण झाल्या आहेत, असे सांगितले. सूत्रसंचालन तथा आभार कवयित्री संध्या भोळे यांनी मानले.
निमंत्रितांसाठी कवी संमेलनाला रसिकांची दाद
कार्यक्रमाच्या सुरूवातीला निमंत्रितांचे कवी संमेलन पार पडले. त्यात आम्ही सिद्ध लेखिका गु्रपच्या कवयित्रींसह राज्यभरातील कवींचा समावेश होता. त्यानंतर कवयित्री जयश्री काळवीट यांच्या सांगवी खुर्द जि. प. शाळेत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचे बालकवी संमेलन पार पडले. अध्यक्षस्थानी वैभव भंडारी होते. काव्यसंमेलन व काव्यसंग्रह प्रकाशन सोहळ्याला रसिक श्रोत्यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन आशा साळुंखे यांनी केले.