ही इमारत सहकाराचा ‘वारसा’ : शेतकऱ्यांच्या भावना
साईमत/जळगाव/विशेष प्रतिनिधी :
सर्वात जुनी आणि सहकार क्षेत्रासाठी मानबिंदू ठरलेल्या जेडीसीसीच्या जळगावमधील नवीपेठेतील ‘दगडी बँक’ म्हणून प्रसिध्द असलेल्या वास्तु विक्री अथवा पुनर्विकासाच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यासाठी नामवंत विकासकांकडून प्रस्तावही मागविण्यात आले होते. दरम्यान, जिल्हा बँकेच्या संचालकांच्या अशा नवीन हालचाली संदर्भात जाणकार व वयोवृध्द शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरु आहेत. शेतकऱ्यांच्या दृष्टीत नवीपेठेतील दगडी बँकेची ही केवळ एक वास्तु नसून सहकाराचा ‘वारसा’ (हेरिटेज) आहे. त्या वास्तुचा पुनर्विकास करतांना तिच्या मूळ रचनेस धक्का न लावता आहे त्या स्थितीतच तिचा पुनर्विकास व्हावा, अशा भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना २७ मे १९१६ मध्ये झाली. जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेती व शेतकऱ्यांना विकासाची दिशा मिळाली. स्थापनेनंतर काही वर्षांनी जिल्ह्यातील तत्कालीन सहकार क्षेत्रातील नेत्यांनी नवीपेठेत सिटी सर्व्हे क्रमांक २११८/३० येथील जागेवर दगडी बांधकामात ही इमारत उभारली कित्येक वर्ष जेडीसीसीचे मुख्यालय म्हणून या दगडी बँकेची ओळख जिल्हाभर होती. सर्वात जुनी इमारत म्हणून या वास्तुकडे बघितले जाते. त्यामुळे तिचा ‘वारसा’ म्हणून जतन करुन ती अधिक देखणी कशी करता येईल, यासाठी प्रयत्न व्हावेत, तसेच त्या इमारतीची ओळख कमर्शिअल वास्तु अशी होवू नये, अशा शेतकऱ्यांच्या भावना आहेत.
जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील काही साखर कारखाने, सूतगिरण्यांच्या वास्तू अशाच विक्री होवून त्यांचे अस्तित्व नामशेष झाले, असे दगडी बँकेबाबतीत होवू नये, अशी अपेक्षाही शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. प्राप्त माहितीनुसार दगडी बँकेच्या वास्तुच्या पुनर्विकासासंदर्भात जाहीर सूचनाही प्रसिध्द केली होती. ७ ते १९ ऑगस्ट २०२५ दरम्यान बांधकाम-व्यावसायिक अथवा विकासकांकडून फारसा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत नाही. पुनर्विकासाच्या नावाखाली विक्रीचा प्रयत्न होवू नये, अशी अपेक्षा काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.