निमखेडी शिवार परिसरात ‘रेडक्रॉस’ दवाखान्याचे उद्घाटन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
आरोग्य सेवेच्या क्षेत्रात ‘रेडक्रॉस’ने आणखी एक यशस्वी पाऊल टाकत भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून निमखेडी शिवार तसेच चंदू अण्णा नगर, शिवधाम मंदिर परिसरातील सर्व नागरिकांना अत्यल्प सेवाशुल्कात सर्व प्रकारच्या आरोग्यसेवा आणि सवलतीच्या दरात औषधी व रुग्णसेवा मिळावी, अशा उद्देशाने जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा रेडक्रॉसचे पदसिद्ध अध्यक्ष आयुष प्रसाद यांच्या हस्ते रेडक्रॉस संचलित रेडक्रॉस दवाखाना सुरू करण्यात आला.
रेडक्रॉस संस्थेच्या पुढाकाराने सुरु केलेल्या दवाखान्यामुळे परिसरातील गरजू नागरिकांना अत्यल्प सेवा शुल्कात सेवा मिळणार आहे. भविष्यात याठिकाणी अनुभवी आणि तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत विविध आरोग्य तपासणी शिबिरे व इतर आरोग्य सेवा सुरु करण्यात येणार असल्याचे मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी दवाखान्याचे प्रकल्पप्रमुख विजय राणा, वैद्यकीय सेवा देणारे डॉ. योगेश पाटील, मेडिकल संचालक सागर हिरवणे यांचे कौतुक करून तिघांना सन्मानित करण्यात आले.
उद्घाटन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जिल्हा मेडिकल डीलर्स असोशिएशनचे अध्यक्ष सुनील भंगाळे, सचिव अनिल झंवर तसेच रेडक्रॉसचे चेअरमन विनोद बियाणी, व्हाईस चेअरमन विजय पाटील, सचिव सुभाष सांखला, रक्त केंद्राचे चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, कार्यकारिणी सदस्य अनिल शिरसाळे, रेडक्रॉस सभासद तथा दवाखाना मार्गदर्शक डॉ. रितेश पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
अत्यल्प सेवा शुल्कात मिळणार गरजूंना सेवा
डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी त्यांच्या स्नुषा डॉ. सृष्टी जैन या अत्यल्प सेवा शुल्कात परिसरातील नागरिकांना सेवा देतील, अशी माहिती दिली. यावेळी विनोद बियाणी, विजय पाटील, अनिल झंवर यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी परिसरातील नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी उज्ज्वला वर्मा यांनी केले.