साईमत, चोपडा : प्रतिनिधी
जीवनात वाचनाचा संस्कार असणे गरजेचे आहे. त्यामुळे जगण्याचा अर्थ कळतो. यासाठी जीवनात वाचनामुळे माणूस समर्थ बनतो, असे प्रतिपादन म.गां. माध्यमिक विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका जयश्री पाटील-चव्हाण यांनी केले. त्यांनी डॉ.कलाम यांच्या जीवनातील संस्कारक्षम आणि प्रेरणादायी प्रसंग विद्यार्थ्यांना सांगितले. येथील महिला मंडळ माध्यमिक विद्यालयात माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिवस साजरा केला. त्यावेळी त्या बोलत होत्या. वाचन प्रेरणा दिनानिमित्त वाचनाचे जीवनातील महत्त्व आणि डॉ.कलाम यांच्या जीवनातील ठळक, प्रेरणादायी घटनांचा विद्यार्थ्यांना परिचय करून दिला.
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील चौधरी, पर्यवेक्षक सुनील पाटील, ज्येष्ठ शिक्षक चंद्रकांत चौधरी, अनिल महाजन, विजय पाटील आदी उपस्थित होते. सुरुवातीला प्रमुख मार्गदर्शक जयश्री चव्हाण-पाटील, विद्यालयातील विद्यार्थिनी जान्हवी बडगुजर यांच्या हस्ते प्रतिमापूजनासह ग्रंथाचे पूजन केले.
कार्यक्रमानिमित्त विद्यालयातील बागेतील झाडांवर पुस्तकांची आकर्षक मांडणी केली होती. कार्यक्रमादरम्यान विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. यशस्वीतेसाठी शिक्षक संजय सोनवणे, भावेश लोहार, वनराज महाले, प्रशांत चव्हाण, कविता पाटील, विजय पाटील, यशोदा ठोके, ग्रंथपाल राजेश गुजराथी, मदतनीस धनराज मिस्तरी, संजय पाटील, बाळासाहेब भालेराव यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन तथा आभार शिक्षक संजय बारी यांनी मानले.