Raver : रावेर पोलिसांची धडक कारवाई

0
10

सोनसाखळी चोरी प्रकरणातील दोन गुन्हे उघड; दोघांना अटक

साईमत/  रावेर/प्रतिनिधी :

रावेर पोलिसांनी जबरी सोनसाखळी चोरी प्रकरणात तत्पर व प्रभावी कारवाई करत दोन सराईत आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून दोन लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, दि.१ डिसेंबर रोजी शोभाबाई सुरेश पाटील या वाघोड येथील महिला रावेरहून वाघोडकडे जात असताना स्मशानभूमीजवळ दोन युवक लाल-काळ्या पल्सरवर आले आणि रस्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्या चेहऱ्यावर माती फेकत गळ्यातील दहा ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र जबरी तोडून पळ काढला. या प्रकरणी रावेर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता.

निवडणुकीच्या तयारीदरम्यानच ही घटना घडल्याने पोलिसांनी प्रकरणाला अत्यंत गांभीर्याने हाताळले. पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी गुन्हे शोध पथकाला तातडीने घटनास्थळी पाठवून परिसरातील सीसीटीव्ही तपास सुरू केला. सुरुवातीच्या फुटेजमध्ये आरोपींचे चेहरे स्पष्ट दिसत नसतानाही पुढील तपासात त्यांच्या पल्सर मोटरसायकलचा आणि शरीरयष्टीचा स्पष्ट अंदाज मिळाला. आरोपींनी रावेर शहरात बराच वेळ रेकी केल्याचे पोलिसांच्या तांत्रिक तपासातून निष्पन्न झाले आणि त्याच आधारे त्यांची ओळख पटली.

तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथक अंतुर्ली (ता. मुक्ताईनगर) येथे पोहोचले. आरोपी गावातून फरार झाल्याचे समजताच पथकाने गावालगतच्या शेतात तळ ठोकला. काही तासांनी आरोपी पुन्हा गावात आल्याची माहिती मिळताच पथकाने त्यांचा पाठलाग केला. दोघेही नरवेल-रोडवरून पल्सरवरून पळून जात असताना काही अंतर पाठलाग करून पोलिसांनी त्यांना पकडण्यात यश मिळवले.

अजय गजानन बेलदार (वय २०) व नरेंद्र ऊर्फ निलेश अशोक बेलदार (वय २०, दोघे रा.अंतुर्ली) यांचा समावेश आहे. चौकशीत आरोपींनी दि.३ नोव्हेंबर रोजी कुऱ्हा-काकोडा बसथांब्यावरून एका महिलेकडून सोनसाखळी तोडल्याची कबुली दिली असून याप्रकरणी देखील मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.या कारवाईत ७५ हजार रुपये किमतीची विना नंबर प्लेटची पल्सर मोटरसायकल आणि एक लाख ७५ हजार रुपये किमतीचे १३.३०४ ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण दोन लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, पोउनि तुषार पाटील आणि गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी केली. सायबर पोलिस स्टेशनचे मिलिंद जाधव व गौरव पाटील यांनी तांत्रिक माहिती पुरवून तपासात महत्त्वाची मदत केली. पुढील तपास पोउनि तुषार पाटील करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here