साईमत रावेर प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील रावेर हे रेशन माफियांचे केंद्र बनले आहे. रावेर – बर्हाणपूर मार्गावर असलेल्या गोदामांमध्ये मोठ्या प्रमाणात रेशनचे धान्य साठवून ते मध्यप्रदेशात काळ्या बाजारात विक्री केले जाते. याच संशयामुळे जिल्हाधिकारी अमान मित्तल यांनी बुधवारी छापे टाकून गोदाम सील केले. मात्र, त्यांनी तपासणी केल्याचे स्थानिक महसूल प्रशासनातर्फे सांगण्यात आले. मात्र, गोपनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यापूर्वीच्या छापेमारी सारखे ‘अर्थपूर्ण’ घडामोडीतून कारवाई थांबविली जाईल काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
रावेर हे मध्यप्रदेशापासून जवळचे शहर आहे.
मध्यप्रदेशातील खरगोन आणि खंडवा येथे काही गोदाम आणि तांदूळ पॉलिस करणारे छोटे कारखाने आहेत. रावेर, यावल आणि परिसरातील गावातील रेशन दुकानांमधून रेशनचा माल उचलून तो शासकीय गोदामात, खाजगी गोदामात ठेवला जातो. तेथून तो थेट मध्यप्रदेशात जातो. या काळ्या बाजारात स्थानिक रेशन माफिया आणि महसूलच्या पुरवठा विभागातील यंत्रणा गुंतली आहे. आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर अनेक तत्कालीन, महसूल अधिकारी, जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी यांनी छापेमारी केली पण, काही राजकिय वरदहस्तामुळे गुन्हे दाखल झालेले नाही. आता ही हाच कित्ता जिल्हाधिकारी अमन मित्तल गिरवतील की गुन्हे दाखल करतील, अशी चर्चा या दोन्ही तालुक्यात सुरू आहे. काही वर्षांपूर्वी रावेरचे विलास चौधरी आणि यावलचे बाळू नेवे यांच्या गोदामावर कारवाई करण्यात आली होती. मात्र कोणतेही गुन्हे दाखल झाले नव्हते. आजही या दोन्ही लोकांचेच, पण त्यांच्या नावावर नसलेले रेशन दुकान आहेत, आणि पूर्वी प्रमाणेच माल मध्य प्रदेशात जात असल्याचे बोलले जात आहे.
रावेर येथे नव्याने नियुक्त झालेले तहसीलदार बंडू कापसे यांना या प्रकाराची माहिती नाही, असे म्हटले तरी त्यांच्या यंत्रणेतील अनेक लोक गुंतले आहेत. त्यामुळे त्यांनी कारवाई करणे टाळले का? त्यांनी कारवाई केली नाही म्हणुन जिल्हाधिकारी मित्तल यांना अचानक तपासणी करावी लागली. त्यानंतर दोन धान्य गोदाम सील केले. पण जिल्हाधिकारी मित्तल यांनी ही कारवाई पूर्णत्वास नेऊन गोरगरिबांच्या तोंडातील घास पळविणाऱ्या रेशन माफियांविरुध्द गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी होऊ लागली आहे.