साईमत, चोपडा : प्रतिनिधी
येथील श्री व्यंकटेश बालाजी संस्थांनाचा सुमारे चारशेपेक्षा जास्त वर्षांची विशाल परंपरा असलेला वहनोत्सव व रथोत्सव रविवारी, १५ ते २६ ऑक्टोबर दरम्यान शहरात साजरा होणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष प्रवीण गुजराथी, विश्वस्तांनी दिली आहे.
चोपड्याच्या सांस्कृतिक वारसा असणाऱ्या ब्रम्होत्सव महोत्सवाला १५ ऑक्टोबरपासून वहनोत्सव सुरु होवून दररोज वेगवेगळ्या वहनावर आरुढ होवून श्री बालाजी महाराजांची विविध भागात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येईल. त्यानिमित्त उत्सवाची मोठी उत्सुकता नागरिकांमध्ये आहे.
वहन आणि त्याचा मार्ग असा राहील. १५ रोजी हत्ती (गांधी चौक, बाजारपेठ), १६ ला चंद्र (मोठा देव्हारा, गणेश कॉलनी), १७ ला सिंह (अरुणनगर, श्रीराम नगर), १८ ला मोर (गुजर अळी), १९ ला नागोबा (सुंदरगढी),२० ला गरुड (जबरेराम मंदिर, भाटगल्ली), २१ ला मारुती (बडगुजर गल्ली), २२ ला सूर्य (पाटील गढी, मल्हारपुरा), २३ वाघ (गुजराथी गल्ली),२४ ला घोडा( बाजारपेठ). वहनोत्सव दररोज धार्मिक विधीनंतर रात्री नऊ वाजेनंतर मंदिरापासून निघेल.
२५, २६ ऑक्टोबरला रथोत्सव
श्री व्यंकटेश बालाजी संस्थानचा खान्देशात प्रसिद्ध असलेला रथोत्सव २५ आणि २६ ला होणार आहे. बुधवारी, २५ ला सकाळी १० वाजता गोलमंदिराजवळील श्री बालाजी मंदिरापासून रथोत्सवाला प्रारंभ होईल. आशा टॉकीज, ग्रामदैवत श्री आनंदी भवानी मंदिर, या मार्गाने रथ आठवडे बाजार, पाटील दरवाजा मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुक्कामी येईल. त्याठिकाणी रात्रभर भाविकांच्या दर्शनासाठी राहिल. २६ रोजी रथाच्या परतीच्या प्रवासाला सकाळी १० वाजता प्रारंभ होईल. बाजारपेठ मार्गाने पुन्हा गोलमंदिराजवळ येवून यंदाच्या वहनोत्सव रथोत्सवाचा समारोप होईल. यानिमित्त रथोत्सव काळात शहरात दोन दिवसाची रथयात्रा भरते. शहराच्या श्रध्देचा भाग असलेल्या सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.