पहुरला पुलाच्या कामासाठी पत्रकार संघटनेतर्फे उद्या ‘रास्तारोको’

0
72

साईमत/ न्यूज नेटवर्क/ पहुर, ता.जामनेर :

जळगाव-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील पहुर येथील पूलाचे काम पूर्ण करा, अशा प्रमुख मागण्यांसाठी शहर पत्रकार संघटनेतर्फे शुक्रवारी, १२ जुलै रोजी सकाळी १० वाजता वाघुर नदी पुलावरच शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष प्रवीण कुमावत यांच्या नेतृत्वाखाली ‘रास्तारोको’ आंदोलन करण्यात येणार आहे. पत्रकार संघाकडून तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांना आंदोलनाची माहिती देण्यात आली आहे. शहर पत्रकार संघटनेतर्फे पहुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सानप आणि जामनेर येथील तहसीलदार नानासाहेब आगळे यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले. यावेळी शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष प्रवीण कुमावत, ज्येष्ठ मार्गदर्शक शांताराम लाठे, कार्याध्यक्ष किरण जाधव, सदस्य डॉ. संभाजी क्षीरसागर, माजी अध्यक्ष शंकर भामेरे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.

खान्देश आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या जळगाव छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ एफवरील पहूर गावाजवळ वाघूर नदीवरील पुलाचे काम गेल्या साडेचार वर्षांपासून रेंगाळले आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह नागरिक आणि वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पुलाचे रखडलेले काम तात्काळ पूर्ण करावे, नवीन पूल वाहतुकीसाठी खुला करावा, पुलाच्या दोन्ही बाजूस असणारे जीव घेणे खड्डे कायमचे कॉंक्रिटीकरण करून भरावेत, पूल परिसरात आवश्यक त्याठिकाणी कठडे बसविण्यात यावेत, तीन निरपराध नागरिकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, त्यास कठोर शिक्षा व्हावी अशा प्रमुख मागण्यांसाठी पहूर शहर पत्रकार संघटनेतर्फे आंदोलन करण्यात येणार निवेदनात नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here