आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या लागल्या रांगाच रांगा
साईमत/रावेर/विशेष प्रतिनिधी
बऱ्हाणपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर रावेरजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनधारकांना होणाऱ्या त्रासामुळे आंदोलनाचे आयोजन केले होते. हे आंदोलन शासकीय विश्रामगृहाजवळ शेतकरी नेते सुरेश चिंधू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
बऱ्हाणपूर ते अंकलेश्वर महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या कारणास्तव स्थानिक शेतकरी आणि वाहनधारकांनी रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. सुमारे २० मिनिटे वाहतुकीची कोंडी झाली होती. आंदोलनामुळे महामार्गावर मोठ्या संख्येने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
आंदोलनात जे.जे. पाटील, दिनेश सईमिरे, जितेंद्र कोळी, स्वप्निल चौधरी, ज्ञानेश्वर पाटील, प्रमोद कोळी, सुपडू राजपूत, प्रशांत पाटील, घनशाम पाटील, रमा कोळी, जितु पाटील यांच्यासह शेतकरी, वाहनधारक सहभागी झाले होते. त्यांनी आपल्या मागण्यांचे समर्थन करत खड्डे त्वरित दुरुस्त करण्याची मागणी केली.
रस्त्यांची स्थिती सुधारणेसह उपाययोजनेचे दिले आश्वासन
अखेर पोलीस प्रशासनाच्या मदतीने रास्ता रोको आंदोलन थांबविण्यात आला. पोलिसांनी हस्तक्षेप करून वाहनधारकांना मार्गदर्शन केले. ट्रॅफिक पुन्हा नियमित करण्यात आले. आंदोलकांच्या मागणीनुसार प्रशासनाने खड्डे दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले आहे. आंदोलनामुळे स्थानिक प्रशासनावर दबाव निर्माण झाला आहे. रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन देण्यात आले.