मोर्चात महिलांसह विद्यार्थी, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा सहभाग
साईमत/पाचोरा/प्रतिनिधी :
पिंपळगाव हरेश्वर परिसरातील अल्पवयीन हिंदू मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेविरोधात पाचोरा शहरात सकल हिंदू समाज व विविध संघटनांच्यावतीने शुक्रवारी भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. शहरासह ग्रामीण भागातील नागरिक, महिला, विद्यार्थी तसेच सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. मोर्चाची सुरुवात कृष्णापूर येथील हनुमान मंदिरापासून होऊन आठवडे बाजार, गांधी चौक, जामनेर रोड मार्गे निघून मोर्चाची छत्रपती शिवाजी महाराज चौकात सांगता झाली. संपूर्ण मोर्चा शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
मोर्चाच्या शेवटी तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करून प्रशासनाला निवेदन देण्यात आले. निवेदनात अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी आरोपीवर तातडीने कठोर कारवाई करून पीडितेला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच “लव्ह जिहाद” विरोधात ठोस उपाययोजना करून महिलांच्या सुरक्षेची हमी मिळावी, अशी ठाम भूमिका मांडण्यात आली. मोर्चात आ.किशोर पाटील, माजी नगराध्यक्ष वैशाली सूर्यवंशी, संजय वाघ, रावसाहेब पाटील, गणेश पाटील, गोविंद शेलार, जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील, अनिल सवांत, दिनेश अग्रवाल, गजानन जोशी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
आपल्या आया-बहिणींच्या सन्मानाचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. समाजातील प्रत्येकाने सजग राहून अशा अमानुष घटनांना प्रतिबंध घालावा. आपल्या इतिहासातून आणि धर्मग्रंथातून प्रेरणा घेऊन स्त्रीशक्तीचे रक्षण करणे हेच खरे कर्तव्य आहे, असे आवाहन महंत योगीराजनाथ महाराज यांनी केले.