मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे कार्य देशपातळीवर गाजले
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
जामनेर तालुक्यातील गोद्री गावाचे भुमिपुत्र तथा मुंबईतील मुख्यमंत्री सहाय्यता निधी मंत्रालय कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांना टाईम्स ऑफ इंडिया ग्रुपतर्फे “सोशल इम्पॅक्ट समिट- सीएसआर २०२५” अशा भव्य कार्यक्रमात सन्मानपूर्वक स्पीकर म्हणून आमंत्रित केले होते. हा कार्यक्रम मुंबईतील ताज लँड्स एंड, वांद्रे येथे नुकताच पार पडला. रामेश्वर यांनी गावाचे नाव देशपातळीवर उज्ज्वल करणाऱ्या गौरवाने गोद्रीकरांचा अभिमान द्विगुणित झाल्याचा सूर ग्रामस्थांमधून उमटत आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या प्रभावी कार्यपद्धती, विविध यशस्वी उपक्रम आणि भविष्यातील योजनांबाबत उपस्थित मान्यवरांना रामेश्वर यांनी सविस्तर माहिती दिली. देशभरातील दिग्गज उद्योगपती, नामवंत डॉक्टर्स, सीएसआर प्रमुख, विविध एनजीओ प्रतिनिधी उपस्थित होते. याबद्दल गोद्री येथील ग्रामस्थांसह मिलींद लोखंडे मित्र परिवार यांच्यावतीने रामेश्वर नाईक आणि त्यांच्या टीमचे कौतुक केले आहे.