शुक्रवारी अंत्यसंस्कार होणार
साईमत/यावल/प्रतिनिधी-
तालुक्यातील पाडळसे येथील भोरगाव लेवा पंचायतीचे कुटुंबनायक रमेशदादा पाटील यांनी आज अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या माध्यमातून लेवा पाटीदार समाजातील एक महनीय व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून कुटुंबनायक रमेशदादा पाटील हे आजारी होते. अलीकडच्या काळात पंचायतीच्या कार्याध्यक्ष पदाची धुरा ही त्यांच्या चिरंजीव ललित दादा यांच्याकडे सोपवण्यात आली होती. गुरुवारी, ८ ऑगस्ट रोजी रमेशदादा यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर शुक्रवारी, ९ ऑगस्ट रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
रमेशदादा पाटील यांना वंश परंपरागत पद्धतीने १९६९ साली लेवा पंचायतीच्या कुटुंबनायक पदाची धुरा मिळाली होती. यानंतर तब्बल सुमारे ५५ वर्ष त्यांनी या पदावर राहून समाजातील कौटुंबिक कलहाचा न्यायनिवाडा करण्याचे काम केले. रमेश दादा पाटील यांच्या रूपाने लेवा पाटील समाजातील एक खूप मोठे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्याबाबत मान्यवरांनी शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत.